| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
संशयित भेकर या संरक्षित वन्य प्राण्याचे मांस बाळगल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत यांच्याविरोधात वन विभागाने कारवाई केली असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भगत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
भाऊबीजेचा सण जिल्ह्यात साजरा होत असताना, गुुरुवारी सायंकाळी जयेंद्र भगत यांच्या घरावर अलिबाग पोलिसांनी छापा टाकला. पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे याच्यासह त्यांच्या पथकाने कारवाई केली. घरातील किचनमधील फ्रीजमध्ये वन्यजीवन प्राण्याचे मांस असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून मांस जप्त करून ते वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. शुक्रवारी सकाळपासून संशयित आरोपी जयेंद्र भगत यांची चौकशी सुरु होती. अखेर दोन दिवसांनंतर वन विभागाने जयेंद्र भगत यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार वन गुन्हा नोंदविला.
जप्त केलेल्या मांसाचा तुकडा सील करून तपासणी संस्थेत नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अलिबाग पोलिसानंतर वन विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात जयेंद्र भगत सापडले आहेत. त्यामुळे त्यांंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ते मांस कुठून आणले. यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग हे अद्यापपर्यंत वन विभागाने स्पष्ट केले नाही.
वन विभागाकडून आवाहन
वन्यजीवन प्राण्यांची शिकार करण्यास बंदी आहे. वन्यजीव प्राण्यांची शिकार करून नये. त्यांचे मांस जवळ बाळगू नये. असे प्रकार होत असल्यास न घाबरता, तात्काळ अलिबाग वन विभागास माहिती द्यावी, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केले आहे.





