शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांची मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केली आहे.
घरत म्हणाले, पिके कापणीस तयार होती. अनेक शेतकऱ्यांनी भात शेतातच ठेवला होता. पण अवकाळी पावसाने संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरवलं. काहींची पिकं वाऱ्याने पडली, काहींच्या शेतात पाणी साचलं. हा केवळ पिकांचा नाही तर शेतकऱ्यांच्या आशेचा अंत आहे.
ते पुढे म्हणाले, याआधीही पंचनामे झाले, पण एकाही शेतकऱ्याच्या खात्यात मदतीचा एक रुपयाही जमा झालेला नाही. फक्त कागदोपत्री आश्वासनं आणि फोटोसेशन! जर शासनाने पुन्हा स्थानिक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसायचा प्रयत्न केला, तर या वेळेस शेतकऱ्यांचा रोष अनावर होईल. हा रोष आवाजात नाही, तर कृतीतून उमटेल.
घरत यांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर थेट टीका करत सांगितले की, सत्तेत असणाऱ्यांनीच हा आवाज उठवायला हवा होता. पण जनतेला आज मिळणाऱ्या वागणुकीवरून आणि मागील अनुभवावरून लोकांच्या अपेक्षा आता पूर्णपणे संपल्या आहेत. सत्ताधाऱ्यांकडून काहीच आशा नाही. ते केवळ पदासाठी सत्तेत आहेत, पण जनतेच्या वेदनेपासून कोसो दूर आहेत.
ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या या वेदनेची किंमत केवळ नुकसानभरपाई नाही, तर त्यांच्या मेहनतीला योग्य न्याय मिळवून देणे आहे. शेतकरी कामगार पक्ष यासाठी कटिबद्ध आहे. आजही आणि उद्याही शेकापच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. ही आमची वचनबद्धता आहे, आणि ही जनतेला खात्री आहे.
‘शासन जागं होईल की शेतकऱ्यांचा स्फोट दाखवेल?’ हा प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. पण एक गोष्ट निश्चित, शेकाप शेतकऱ्यांना कधीच एकटं सोडणार नाही. हा पक्ष जनतेचा आहे, जनतेसाठी आहे आणि जनतेसाठीच लढतो आहे.
– सुरेश घरत, तालुका चिटणीस,
शेतकरी कामगार पक्ष, अलिबाग





