वीटभट्टी, सुकी मासळीवाले हवालदिल; पावसाचा मुक्काम तब्बल सहा महिने
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
परतीच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील भात शेती बरोबरच अनेक व्यवसायांना बसला आहे. यंदा मे महिन्यात पाऊस सुरु झाला आहे. आणि ऑक्टोबरच्या अखेरीस ही तो मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे या व्यवसायांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
पावसाळा लांबल्याने बांधकाम, विकासकामे करणारे, भात गिरणी, वीटभट्टी, कुंभारकाम, सुकी मासळी, मंडप व डेकोरेशन आदी व्यावसायिक हतबल झाले आहेत. त्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. लांबलेल्या पावसामुळे हे व्यवसाय अक्षरशः डबघाईला आले आहेत. शेतामध्ये भात पीक डोलू लागले होते. आणि तयार झालेला भात कापणीसाठी शेतकरी देखील सज्ज होते. या हंगामात शेतकरी कापणी करून भात गिरण्यांवर भात भरडण्यासाठी गर्दी करतात, मात्र, तयार झालेला भात शेतात पाण्यात आडवा पडल्यामुळे आता शेतकऱ्यांचे तर नुकसान झालेच, मात्र भात गिरणी व्यवसायाचे देखील नुकसान झाले आहे.
कुंभारकाम व्यवसायावर पाणी पालीतील कुंभारकाम व्यवसायिक म्हणाले की परतीच्या पावसामुळे मडकी, चुली व मातीच्या इतर वस्तू आणि मातीची खेळणी खराब झाल्या आहेत. शिवाय पाऊस आणि गारवा असल्याने मडकी व चुलींची विक्री देखील थांबली आहे. शिवाय ऐन दिवाळीच्या हंगामात पाऊस असल्यामुळे पणती विक्रीलाही त्याचा फटका बसला. मातीच्या वस्तू भाजण्यासाठी लागणारा पेंढा, लाकडे व कोळसा देखील भिजला आहे. त्यामुळे भट्टी लावणे अवघड झाले आहे. माती भिजल्याने ती पुन्हा वापरता येणार नाही. मालाला उठाव सुद्धा मिळत नाही. त्यात झालेले नुकसान यामुळे खूप वाताहत होत आहे.
बांधकाम व्यवसायावर गदा
जिल्ह्यात बांधकाम व्यवसाय व फार्म हाऊस व इतर विकसक व्यवसाय वाढत चालला आहे. नवनिर्माणाची कामे देखील काही प्रमाणात होतांना दिसत आहेत. मात्र स्लॅब टाकणे, वीट काम करणे, भराव किंवा उत्खनन करणे, रंगकाम करणे आदी कामांना परतीच्या पावसामुळे प्रचंड अडथळा येत आहे.
विटभट्टी व्यवसाय संकटात
वीट भट्टी व्यवसाय हा बांधकाम व्यवसायाचा कणा मानला जातो. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वीटभट्टी व्यवसाय रुजला आणि वाढला आहे. दरवर्षी पावसाळा कमी झाल्यावर सर्वच वीटभट्ट्यांवर कामाची लगबग सुरू होते. मात्र, यंदा पाऊस खूपच लांबला आहे. यामुळे वीटभट्टी व्यवसाय संकटात सापडला आहे. परतीच्या पावसामुळे मात्र या व्यवसायासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी करणे अवघड झाले आहे.
