। अलिबाग । प्रतिनिधी ।
गेली अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या या परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. अनेक सखल भागात पाणी साचले असून, शेतांमध्येही पाणी भरू लागले आहे.
जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. रात्री व संध्याकाळच्या वेळेला पाऊस सतत कोसळत आहे. जिल्ह्यातील अलिबाग वगळता अन्य तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. शुक्रवारीदेखील सकाळी पाऊस सुरुच होता. दुपारी त्याने काही प्रमाणात विश्रांती घेतली. त्यानंतर सायंकाळी पुन्हा जोर धरला. पावसाचा जोर सतत वाढत राहिल्याने संध्याकाळी घरी जाणार्यांचे प्रचंड हाल झाले. शनिवारी जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत अनेक भागात मुसळधार पाऊस कोेसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, विनाकारण घराबाहेर पडून नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.