| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड ही ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ यांनी या भूमीत इतिहास घडविला आहे. कुळ कायद्याची चळवळ, आंदोलन, कंपनीविरोधात संघर्ष करणारा असा या जिल्ह्याचा इतिहास आहे. चित्रलेखा पाटील यांच्या रुपाने खंबीर नेतृत्व मिळाले आहे. आता धाडसाने बोलण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात 55 ते 60 टक्के मतदान होते. त्यामध्ये महिला मतदानाचा टक्का अव्वल आहे. त्यामुळे उद्याच्या भविष्याची दोरी आणि चावी महिलांच्या हाती असणार आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, आम्हाला एकदा पंधराशे रुपये देण्यापेक्षा गेल कंपनीत नोकरी द्या. आमच्या मुलांना रोजगाराचे दालन खुले करा. कंपनीला आवश्यक असलेल्या रोजगाराचे प्रशिक्षण घ्या. या भागात पर्यटनवाढीसाठी चालना आहे. महिलांना यातून रोजगार व उत्पन्नवाढीसाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. घरापासून विकासाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घ्या. महिला सक्षम होण्यासाठी शेतीबरोबरच मासळी विक्रीच्या उद्योगात महिलांना सक्रीय करून घ्या, तरच त्या सबळ होतील, असेही वैशाली पाटील यांनी सांगितले.