ॲफकॉन कंपनी करणार पुलाचे काम
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यातील धरमतर खाडीवरील रेवस-करंजा पुलाचे स्वप्न आता सत्यात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पूल बांधण्यासंबंधीची निविदा ॲफकॉन कंपनीने जिंकली आहे. ॲफकॉनने हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीपेक्षा 182 कोटी 97 लाख रुपयांची कमी रक्कम निविदेमध्ये नमूद केली होती. पुलाच्या निर्मितीमुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाची कवाडं खुली होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने गुरुवारी तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या. ॲफकॉन (2963.97 कोटी) आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी (3146.26 कोटी) या दोनच कंपन्यांनी या कामासाठी स्वारस्य दाखवले. ॲफकॉन माजी मुख्यमंत्री स्व. ए.आर. अंतुले यांनी सर्वप्रथम रेवस-करंजा पुलाची निर्मिती करण्याचे ठरवले होते. मात्र, कालांतराने हा विषय मागे पडला होता. रेवस-करंजा पुलाच्या उभारणीमुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही जवळ येणार आहे. रायगड जिल्ह्यातील राज्य महामार्ग-4 (रेवस-रेड्डी कोस्टल हायवे) वरील हा 4 लेन पूल जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अलिबागदरम्यानचे अंतर अंदाजे 55 कि.मी.वरून 30 कि.मी.पर्यंत कमी होणार आहे. सदरचा पूल हा 2.04 कि.मी. लांबीचा आहे. 29.50 मीटर रुंद पूल असणार आहे. या पुलावरुन तब्बल 80 कि.मी. प्रतितास वेगाने वाहने धावतील असेच डिझाइन विकसित करण्यात येत आहे. पुलावर दोन्ही बाजूला 1.5 मीटर रुंद पादचारी पदपथ समाविष्ट करण्यात आले आहेत. करंजा येथे 5.13 कि.मी. लांबीचा रस्ता बांधण्यात येणार आहे, तर रेवस येथे 1.71 कि.मी. लांबीचा रस्ता स्टिल्टवर बांधण्यात येणार आहे.
एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्सने (एसपीएससीएल) फेब्रुवारी 2023 मध्ये या कामासाठी सर्वात कमी रक्कम नमूद केली होती. परंतु, तांत्रिक फेरीत एसपीएससीएल पात्र ठरले असताना आणि आर्थिक बोली अंदाजापेक्षा 11.13 टक्के कमी असूनही मे 2023 मध्ये निविदा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे पुलाचे बांधकाम रखडणार असे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर पुन्हा डिसेंबर 2023 मध्ये नव्याने निविदा मागवण्यात आल्या होत्या. दरम्यान, मागील निविदेत केवळ 2 कि.मी. लांबीच्या पुलाचे बांधकाम करण्याचे नियोजन होते. सध्याच्या निविदेत पुलाचे काम आणि अप्रोच रस्त्यांचे काम एकाच निविदेत एकत्र केले आहे, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
आगरदांडा खाडीपुल खुलासा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बुधवारी 4.3 किमी आगरदांडा खाडी पुलासाठीची निविदा उघडली. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने (एचसीसी) पुलाच्या बांधकामासाठी सर्वात कमी बोली लावली. त्यांनी अफकॉन कंपनीला मागे टाकले आहे. एचसीसीने 1187.76 कोटी, तर अफकॉनने 1249.42 कोटी रुपयांची बोली लावली होती. एचसीसीने 61.66 कोटी रुपये अपकॉनपेक्षा कमी नमुद केले. रायगड जिल्ह्यातील टोकेखार ता. मुरुड आणि तुरुंबडी ता. म्हसळा यांना हा जोडणारा पुल आहे.