सरपंच व ग्रामसेवकांची उपस्थिती नसल्याने जबाबदारीचा प्रश्न ऐरणीवर
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रेवदंडा येथील कचरा भूमीला भीषण आग लागली. या आगीने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीने काही वेळातच उग्र रुप धारण केले होते. परिसरात दाट धूर, जळत्या कचऱ्याचा वास वातावरणात निर्माण झाला होता. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली, तरी परिस्थिती अत्यंत गंभीर होती. जेएसडब्लूच्या अग्नीशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, सरपंच व ग्रामसेवक या ठिकाणी उपस्थित नसल्याने जबाबदारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डम्पिंग ग्राउंड परिसरात मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील कचरा साठलेला असून आजूबाजूला वस्ती असल्याने आग अधिक पसरली असती, तर जीवितहानी व मोठे नुकसान झाले असते, हे नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांची तात्काळ उपस्थिती अपेक्षित असते. मात्र, या गंभीर घटनेच्या वेळी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल मोरे तसेच ग्रामसेवक सुदेश राऊत हे प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित नसल्याची बाब समोर येत आहे. ग्रामसेवक हे अलिबाग येथे वास्तव्यास असल्याने तात्काळ घटनास्थळी पोहोचणे शक्य झाले नाही, अशी माहिती आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ग्रामपंचायतीची प्रतिसाद व्यवस्था किती सक्षम आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डम्पिंग ग्राउंडसारख्या संवेदनशील ठिकाणी आग लागणे ही वारंवार घडणारी आणि गंभीर बाब आहे. या ठिकाणी नियमित देखरेख, प्रतिबंधक उपाययोजना आणि तातडीचा प्रतिसाद देणारी यंत्रणा असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्ष संकटाच्यावेळी सरपंच व ग्रामसेवकांची उपस्थिती नसणे ही बाब ग्रामस्थांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी ठरत असल्याची चर्चा आहे. जेएसडब्लूच्या अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी हानी टळली. परंतु ही आग अधिक पसरली असती आणि जीवितहानी झाली असती, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणावर आली असती ?, असा थेट प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. ग्रामसभांमध्ये दिल्या जाणाऱ्या आश्वासनांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृती आणि जबाबदारीची जाणीव दाखवली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आगीचे नेमके कारण, डम्पिंग ग्राउंडच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि आपत्कालीन व्यवस्थापनाची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात याव्यात,अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.





