बनावट प्रमाणपत्रावर नोकरी मिळविल्याचा प्रकार उघड

। जेएनपीटी । वार्ताहर ।
बनावट क्रिमिलेअर प्रमाणपत्र बनवून पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी मिळविलेल्या उरणच्या करंजा येथील तरूणाचे प्रताप अखेर उघड झाले असून प्रमाणपत्र व्हेरीफिकेशन करताना हा प्रकार उघड झाला आहे. प्रितेश पद्माकर पाटील (30) असे या तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रितेश पद्माकर पाटील या तरूणाला त्याच्या गुणवत्तेवर आणि कागदपत्रांच्या आधारावर पुणे महानगरपालिकेत आरोग्य सेवेत परिवहनमध्ये गट क या पदावर नियुक्त करण्यात आले होते. नियुक्तीनंतर त्यांचे प्रमाणपत्र कोकण आयुक्तांकडे तपासणीसाठी आले होते. तेथून ते अलिबाग आणि शेवटी उरण तहसिल कार्यालयात तपासणीसाठी आले होते. प्रितेश पाटील याचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र तपासले असता त्यावरील बारकोड स्कॅन केल्यानंतर या दाखल्यावरच्या तारखेमध्ये फेरफार केल्याचे निष्पन्न झाले. तसेच नॉन क्रिमिलेअर दाखल्यावर डिजिटल सही, उपविभागीय अधिकारी, यांचे नाव तारीख यांचा गोल शिक्का असतो मात्र या दाखल्यावर तो नव्हता. त्यामुळे हा दाखला फेरकरून करून बनावट पद्धतीने तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चाणजे सजाचे तलाठी तेजस चोरगे यांना याबाबत उरण पोलीस ठाण्यात प्रितेश पाटील याच्यावर फेरफार करून बनावट क्रिमिलेअर दाखला दाखल करून नोकरी मिळविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उरण पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version