शेकापच्या मोर्चाचा दणका

महसूल विभागाची कारवाईची हालचाल; तहसीलदारांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना अहवाल सादर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

पळस्पे येथील शेतकऱ्याच्या जमिनीची कथित फसवणूक करून 13 गुंठे जमीन लाटण्याच्या प्रयत्नाविरोधात शेतकरी कामगार पक्षाने काढलेल्या मोर्चाची अखेर महसूल प्रशासनाने दखल घेतली आहे. महसूल विभागाने वादग्रस्त जागेची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला शेकापच्या आंदोलनानंतर जाग आली असून, शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी शेकाप शेतकरी सभेचे जिल्हाध्यक्ष अनिल ढवळे यांनी पुकारलेल्या लढ्याला यश मिळताना दिसत आहे.

पनवेल तालुक्यातील पळस्पे येथील पांडुरंग बाळू पाटील उर्फ घोरपडे या शेतकऱ्याची सर्व्हे क्रमांक 79/1 मध्ये 183 गुंठे जमीन आहे. याच गटात बेडेकर यांची 40.5 आर मिळकत होती. बेडेकर यांनी 1983 मध्ये ही मिळकत पळस्पे येथील शेतकरी नाना भगत यांना विकली. भगत यांनी जमिनीची मोजणी न करताच 26 जुलै 1994 रोजी पनवेल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात 15 पानी खरेदीखत तयार करून 40.5 आर क्षेत्राची मिळकत शकुंतला सामंत यांना विकली. त्यानंतर 17 जून 2006 रोजी शकुंतला सामंत यांनी विनामोबदला बक्षीसपत्राद्वारे ही जमीन मनिषा सामंत आणि सुहास सामंत यांना दिली. सुहास सामंत यांनी जमिनीचे सर्वेक्षण करून सातबारा उताऱ्यात बदल घडवून आणल्याचा आरोप आहे.

पांडुरंग पाटील यांच्या अज्ञानाचा फायदा घेत सर्व्हे अधिकारी आणि सामंत यांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि मूळ 40.5 आरऐवजी 53.10 आर क्षेत्राची नोंद करून जमीन लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पांडुरंग पाटील यांनी सामंत यांच्याशी जमिनीचा कोणताही व्यवहार केला नसताना त्यांच्या मिळकतीतील 13 गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची महसूल विभागाकडे वारंवार तक्रार करूनही पनवेल तहसीलदारांनी दुर्लक्ष केल्याने अखेर शेकापने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

शेकापचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकाप शेतकरी सभा रायगड जिल्हाध्यक्ष अनिल ढवळे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 30 ऑक्टोबर) पनवेल तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढला होता. सातबारा उताऱ्यावरील कमी झालेली जमीन पूर्ववत करून शेतकऱ्याच्या नावाने योग्य सातबारा तयार करावा, यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या होत्या. या आंदोलनानंतर महसूल विभागाने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या विचारातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेकाप शेतकरी सभेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरूच राहणार असल्याचे अनिल ढवळे यांनी स्पष्ट केले.

शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यात धोरणात्मक शेतकरी सभा सेल निर्माण केला. या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करण्याची संधी मिळाली. शेकाप नेते बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी सतत लढण्याची भूमिका घेतली. त्यातूनच पळस्पे येथील शेतकऱ्याच्या प्रश्नाला न्याय मिळण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. अन्याय होणाऱ्या शेतकऱ्यांनी शेकाप कार्यालयाशी संपर्क साधावा. शेकाप शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.

– अनिल ढवळे,
अध्यक्ष, रायगड जिल्हा शेतकरी सभा, शेकाप

Exit mobile version