अवैध क्रश सँड वाहतुकीवर महसूलचा दणका

पेण तहसीलदारांची महामार्गावर धडक कारवाई; दोन डंपर जप्त, 70 हजारांचा दंड

| पेण | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावर परवानगीपेक्षा दुप्पट प्रमाणात क्रश सँडची वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर पेण तहसील प्रशासनाने धडक कारवाई केली. तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या पथकाने दोन्ही वाहने ताब्यात घेत 70 हजार 320 रुपयांचा दंड ठोठावल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीविरोधात महसूल विभागाने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेत मुंबई-गोवा महामार्गावर क्रश सँडची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर कारवाई केली. तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत संबंधित वाहनांवर एकूण 70 हजार 320 रुपयांचा दंड आकारण्यात आला.

तपासणीदरम्यान एमएच 43 सीएस 2239 आणि एमएच 47 बीवाय 1210 हे दोन डंपर मुंबई-गोवा महामार्गावरील आरटीओ कार्यालयाजवळ क्रश सँडची वाहतूक करताना आढळले. नियमानुसार चार ब्रास क्रश सँड वाहतुकीची परवानगी असताना दोन्ही वाहनांमधून आठ ब्रास क्रश सँडची वाहतूक केली जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

यानंतर महसूल पथकाने दोन्ही डंपर ताब्यात घेत नियमानुसार दंडात्मक कारवाई केली. यापैकी एमएच 43 सीएस 2239 या डंपरचे मालक रफिक अब्बास सत्तार असल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली. तर, दुसऱ्या डंपरच्या मालकाची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, या धडक कारवाईमुळे अवैध वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

Exit mobile version