डॉ. महेंद्र कल्याणकरांची सवय महसूल अधिकाऱ्यांना नडली

रात्रीपर्यंत रंगली महसूल सप्ताहाची सांगता
| रायगड | खास प्रतिनिधी |
अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात महसूल सप्ताह सांगता समारंभात महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. मात्र दुपारी तीन वाजता सुरु होणारा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता सुरु होऊन रात्री दहा वाजता संपला. या कार्यक्रमाला कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर हे नेहमीप्रमाणे उशिरा पोचले. त्यामुळे सर्वांनाच सुमारे सात-आठ तास ताटकळत बसावे लागले.

डॉ. कल्याणकर हे काही पहिल्यांदाच उशिरा आले नाहीत; तर त्यांची हिच खासीयत असल्याचा अनुभव ते रायगडचे जिल्हाधिकारी असताना सर्वांनीच घेतला आहे. सोमवारी (दि.7) फक्त त्यांची पुनर्रावृत्ती झाली एवढेच. महसुल विभाग हा तसा राज्याच्या तिजोरी भरण्यासाठी महत्वाचा विभाग म्हणून ओळखला जातो. 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

महसूल सप्ताहा दरम्यान जिल्ह्यात 406 चावडी वाचन व 68 महाविद्यालयांमध्ये युवासंवाद कार्यक्रम झाले. 300 आपत्तीप्रवण गावात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. 1 हजार 137 प्रमाणपत्र, 1 हजार 98 नव मतदार ओळखपत्र देण्यात आली. 1 हजार 86 महसूल दाखले, 1 हजार 200 महसूल कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दरड प्रवण गावातील 4 हजार कुटूंबांचे डॅड कार्ड (डिझास्टर ॲप्राझल डेटा कार्ड) पूर्ण करण्यात आले. यासह 133 महसूल अदालती, 20 अनुकंपाधारकांना नियुक्त्या, देशाच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या 9 वीर सैनिक कुटूबियांना जमीन वितरण करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते महसूल योजनांची माहिती देणाऱ्या घडीपुस्तिकेचे आणि महसूल सप्ताहाबाबत भरत सावंत यांनी काढलेल्या आधारवड या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागतानंतर उत्कृष्ट काम करणारे 52 महसूल अधिकारी, कर्मचारी यांसह 8 पाल्यांचा गुणगौरव स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

महसूल सप्ताहामध्ये कोकण विभागात चांगले काम झाल्याचे दिसून आले असून रायगड जिल्ह्यामध्ये या उपक्रमासाठी उत्कृष्ट नियोजन केले गेले. यापूर्वी फक्त महसूल दिनाचा कार्यक्रम होत होता.परंतु शासनाच्या सूचनांनुसार यावर्षी महसूल सप्ताहाचा उपक्रम राबविण्यात आला. सप्ताह संपल्यानंतर देखील यामध्ये सातत्य ठेवत काम करावे असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, अपर विभागीय आयुक्त किसन जावळे, विशेष अतिथी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व चित्रपट निर्माते लेखक अभिषेक जावकर, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पुरस्कार प्राप्त मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल कर्मचारी तसेच अधिकारी, कर्मचारी यांचे गुणवंत पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version