| उरण | प्रतिनिधी |
राज्यात साजरा होत असलेला महसूल सप्ताह हा जनतेच्या सेवेसाठी नसून, महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या खिशाला मलिदा भरण्यासाठीच असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील महसूल विभागाच्या आशीर्वादाने किनारपट्टी भागात बंगले, इमारती, कंटेनर यार्ड, भंगार माफिया, पार्किंग, सर्व्हिस सेंटर, ढाबे, टपऱ्या यांचा अनधिकृत विळखा फोफावला आहे. या सर्व व्यवहारांतून लाखोंचा मलिदा अधिकाऱ्यांच्या खिशात जात असल्याची चर्चा रंगली आहे. वृत्तपत्रांमधून कित्येकदा भांडाफोड झाला, सामाजिक संघटना व पत्रकारांनी वारंवार लेखी पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी केली, तरी प्रशासन गेंड्याच्या कातडीसारखे निष्क्रिय बसले आहे. त्यामुळे जनतेचा आरोप आहे की, महसूल विभाग म्हणजे अधिकाऱ्यांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी असून सरकारने तात्काळ जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करून भ्रष्टाचार उघड करावा. असे न केल्यास जनतेचा राग रस्त्यावर उतरून महसूल कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करू, असाही इशारा देण्यात आला आहे.






