। पनवेल । वार्ताहर ।
सायन-पनवेल महामार्गांवर कळंबोली वसाहत येथे तयार करण्यात आलेला अंडरपास दुरुस्तीच्या कामासाठी अचानक बंद करण्यात आल्याने वसाहतीमधून मुंबईच्या दिशेने जाणार्या वाहन चालकांची तारांबळ उडत आहे.
अंडरपास बंद असल्याने अनेक वाहनचालक उलट्या दिशेने प्रवास करत असल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सायन-पनवेल महामार्गांवरून प्रवास करताना कळंबोली वसाहतीमधून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी अथवा पनवेल येथून येणार्या वाहनाना कळंबोली वसाहतीत प्रवेश करण्यासाठी कळंबोली येथे अंडरपासची व्यवस्था करण्यात आली आहे.
मागील काही दिवसापासून दुरुस्तीच्या नावाखाली हा अंडरपास बंद करण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम करणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही पूर्व सूचना देण्यात न आल्याने वाहनचालकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.