| नेरळ | प्रतिनिधी |
थंड हवेचे ठिकाणी असलेल्या माथेरान मध्ये उन्हाळ्यात सर्वाधिक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. दरवर्षी एप्रिल-मे महिन्याच्या ऐन पर्यटन हंगामात माथेरानला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. 170 वर्षे जुना शार्लोट लेक हा सध्या एकमेव पिण्याच्या पाण्याचा स्रोत असून, ब्रिटिशांनी तयार केलेल्या सिम्पसन टँक या धरणाचे पुनर्जीवन करावे आणि पाणीप्रश्न सोडावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन सावंत यांनी केली आहे.
ब्रिटिशांनी माथेरानचा शोध लावल्यावर माथेरान मध्ये राहणारे लोक यांच्यासाठी 800 मीटर उंचीवरदेखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी. या दृष्टीने शार्लोट लेकनंतर 1876 मध्ये कॅप्टन सिम्पसन यांनी बांधून घेतला आणि दोन ठिकाणी धरणे बांधली. माथेरानमध्ये 220-250 इंच पाऊस पडूनही मे महिन्याच्या ऐन हंगामात पाण्याअभावी माथेरानचे पर्यटन धोक्यात येत आहे. कारण पाण्याचा तुटवडा भासत आहे असून, त्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कारणीभूत आहे. प्राधिकरणकडून राबविण्यात येत असलेल्या योजनेमुळे शहरात व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही आणि सर्व भागाला प्राधिकरण पाणी पुरवू शकत नाही हे सिद्ध झाले आहे.
सध्या माथेरान मधील दुर्लक्षित असलेला सिम्पसन टँक तातडीने पुनरुज्जीवित करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. या तलावाची मूळ क्षमता 76,000 क्यूबिक मीटर होती. 1907 पासून मिनी ट्रेनच्या वाफेच्या इंजिनासाठी याच तलावातून पाणी वापरले जात होते. सिम्पसन टँकमधील पाणी नगरपरिषद प्रशासनाने नळपाणी योजना तयार करून शहरात वितरित केल्याने मोठा आर्थिक लाभ पालिकेला होऊ शकतो. प्रथम घरगुती नळधारक, नंतर लॉज व्यावसायिकांना रास्त दरात पाणी मिळेल. दस्तुरी ते रेल्वे स्टेशन परिसरात अग्निशमन यंत्रणेसाठी पाण्याचे कॉक उभारणे शक्य होईल. तलावात बोटिंग, रोप क्रॉसिंगसारखे साहसी खेळ सुरू करून पर्यटनवाढ आणि अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल.






