पावसाअभावी भातपीक अडचणीत

शेतजमिनीला पडू लागल्या भेगा; भाताच्या रोपांना रोगांचा धोका

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतजमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. पाण्याअभावी रोपांची वाढ रोखली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भातपीक अडचणीत सापडला आहे. त्याचा फटका शेतकर्‍यांना बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे 98 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भातपिकाची लागवड करण्यात आली. जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात भातलावणीची कामे पूर्ण झाली. दरम्यान, जुलैअखेरपर्यंत पाऊस सुरु राहिल्याने शेतकरीदेखील सुखावून गेला होता. अनेक शेतकर्‍यांनी लावणीची कामे पूर्ण झाल्यावर पिकाच्यावाढीसाठी खतांचा मारा केला. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. ऐन पावसाच्या हंगामात उन्हाळ्याचे वातावरण निर्माण झाले. शेतांसह नदी, नाल्यांमधील पाण्याची पातळी कमी झाली आहे. पावसाअभावी शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे भातपिकांच्या वाढीला अडथळा निर्माण झाला आहे. पाऊस नसल्याने भातांची रोपेदेखील पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या किडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

सध्या भातपिकाच्या वाढीचा हंगाम आहे. परंतु, पाऊस पडत नसल्याने वाढीवर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे. शेतजमिनींना भेगा पडू लागल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

रमेश पाटील,
शेतकरी

जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस आहे, तर काही ठिकाणी नाही. सद्यःस्थितीत भातपिकाला पाण्याची गरज आहे. ज्या भागात पाऊस पडला नाही, त्या जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्या शेतकर्‍यांनी पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे. पाण्याची पातळी पाच सेंटीमीटरपर्यंत ठेवणे आवश्यक आहे. बोअरवेअल, विहिरीच्या माध्यमातून पाण्याच्या पर्यायी व्यवस्था केली पाहिजे.

डॉ. रवींद्र मर्दाने
विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत

Exit mobile version