सांडपाण्यामुळे भातपीक वाया

तुपगाव गृहप्रकल्पाचा शेतकर्‍याला फटका
तात्काळ कारवाई करण्याची मागणी
पिकांचे नुकसान

| रसायनी | वार्ताहर |

चौक तुपगाव ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या गृहप्रकल्पामुळे सुरेश गोविंद गुरव या शेतकर्‍याची जमीन नापीक झाली असून, शेती वाचवण्यासाठी गुरव यांनी शासनाकडे धाव घेतली आहे. गुरव पिढ्यान्पिढ्या शेती करत असून, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. खरीप आणि रब्बी अशी दोन्ही पिके एक एकर शेतामध्ये दरवर्षी घेतात. परंतु, यंदा शेतीलगत सुरू असलेल्या गृहप्रकल्पाचा फटका गुरव यांना बसला आहे. गृहप्रकल्पासाठी वापरण्यात येणार्‍या पाण्याचा निचरा थेट गुरव यांच्या शेतात होत आहे. त्यामुळे यंदाचे भातपीक वाया गेले.

याबाबत शेतकरी गुरव यांनी मंडल अधिकारी चौक किरण पाटील यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज करून भरपाई मिळावी यासाठी मागणी केली. मंडल अधिकार्‍यांनीदेखील पंचनामा केला आहे. परंतु, दहा दिवसांचा कालावधी उलटूनसुद्धा अद्याप काही कारवाई न झाल्यामुळे गुरव हताश झाले आहेत. एकीकडे तालुक्यातील शेती आणि शेतकरी हाताच्या बोटावर मोजण्याएवढा शिल्लक राहिला असताना धनाढ्य बिल्डरमुळे उरले सुरलेली शेतीदेखील नष्ट होणार आहे. त्यामुळे शासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत असून, शासनाने याची तातडीने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.

यंदाचे भातपीक वाया गेले आहे. दरवर्षी वाल पिकातून मोठी कमाई होते. परंतु, वाल पिकालादेखील त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे तक्रार अर्ज केला आहे. 0 सुरेश गोविंद गुरव, पीडित शेतकरी, तुपगाव


गुरव यांच्या नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा केला असून, तहसील कार्यालयाकडे त्याबाबत अहवाल पाठवला आहे. गुरव त्यांच्या अर्जानुसार दखल घेतली आहे. – किरण पाटील, मंडळ अधिकारी, चौक खालापूर

Exit mobile version