हळवी पिके कापणीसाठी तयार

| पाताळगंगा | वार्ताहर |

यंदा तालुक्यात 23 जून नंतर पाऊस झाला होता. त्यामुळे भात पेरणी, पुर्नलागवड आदी कामेही एक महिना लांबणीवर पडली; मात्र खारेपाटण पंचक्रोशीतील अनेक शेतकऱ्यांनी नदी, तळी, शेतविहिरीतील पाण्याचा वापर करून जूनच्या पहिल्या आठवड्यात भात पेरणी केली होती. ही हळवी भात शेती आता परिपक्व झाली आहे.

गेल्या दहा दिवसांपासून पावसानेही काढता पाय घेतला आहे. तर पुढील आठवडाभरात परतीचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे तयार झालेल्या भात पिकाच्या कापणी कामांना सध्या वेग आला आहे. यंदा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाला. तसेच संपूर्ण जुलै महिन्यातही मुसळधार सरी कोसळल्या. एल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट महिना कोरडा गेला. त्याचा मोठा परिणाम हळव्या भातशेतीवर झाला असून यंदा उत्पादनात वीस टक्के घट होईल, असा अंदाज इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तर 120 ते 140 दिवसांची भात शेती सप्टेंबर महिन्यातील पावसाने तरली आहे. या भातपिकाला सध्या फुलोरा येऊन दाणा तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दसरा ते दिवाळी या सणांच्या दरम्यान महान भातशेती तयार होणार आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पाऊस झाल्याने सध्या भातशेतामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. त्यामुळे मॉन्सूनने माघार घेतली तरी या भातशेतीवर फारसा परिणाम होणार नसल्याचेही काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version