अवकाळी पावसामुळे भातशेती धोक्यात

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

संगमेश्‍वर तालुक्यात अवकाळी पावसामुळे भात शेतीला मोठा फटका बसला आहे. मागील तीन महिन्यांत 251 शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाकडे करण्यात आली आहे.

तालुक्यात 6 हजार 250 हेक्टर भातशेतीची लागवड क्षेत्र असून, शेतकरी पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतीने भातशेती करत आहे. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीला बसत असून, अवकाळी पावसामुळे पिकलेली भातशेती आडवी झाली आहे. जंगली प्राण्यांचा होणारा त्रास आणि अवकाळी पाऊस यामुळे भातशेतीच्या लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. यातच शेतीसाठी मनुष्यबळही मिळत नाही, तर आधुनिक यंत्रसामुग्री घेणे परवडत नाही. यामुळे जिल्ह्यात शेतीचे क्षेत्र घटत आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे नुकसान होत आहे. दिवसा कधीही पाऊस कोसळत असल्याने भातशेती तयार झाली असतानाच कापणी करायची कशी, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे.

Exit mobile version