| रत्नागिरी | प्रतिनिधी |
बांदा व परिसरातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे मोठे संकट कोसळले आहे. अनेक ठिकाणी उभे पीक आडवे पडून जमिनीवरच कुजण्याच्या अवस्थेत आले आहे, तर काही ठिकाणी कोंब फुटल्याने धान्य निरुपयोगी ठरत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. पाडलोस, न्हावेली, मडुरा, कास, निगुडे, सोनुर्ली, सातोसे, शेर्ले, दांडेली, बांदा, वाफोली, विलवडे आणि इन्सुली या गावांमध्ये गेल्या सहा दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. खत, बियाणे, मजुरी यांवर हजारो रुपये खर्च करून उभे केलेले पीक अवकाळी पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. काही ठिकाणी कापणी करून ठेवलेले पीक पावसाने भिजून कुजत असून, ते विकण्यायोग्य राहिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील आशेचा किरण आता अवकाळी पावसात बुडाल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले.







