। पनवेल । वार्ताहर ।
पेरणी योग्य पाऊस झाल्याने पनवेल मधील शेतकरी आपल्या शेतात नागरंणी करीत असून धान्ये पेरणीच्या कामाला लागला आहे. यावर्षी कृषी विभागाच्या माहितीनुसार तालुक्यात 6300 हेक्टरवर भातशेती केली जाणार आहे.
तालुक्याचा झपाट्याने विकास होत आहे. तालुक्यात आंतराष्ट्रीय विमानतळ आल्याने जमिनींना सोन्याचे भाव प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेती करणार्या शेतकर्यांची संख्या दरवर्षी झपाट्याने कमी होत आहे. मात्र असे असले तरी बहुतांशी शेतकरी आपला परंपरागत शेती व्यवसाय करीत आहेत. अनेक शेतकर्यांनी पेरणीपूर्व मशागत तसेच खत टाकणे, पार, धुरे दुरुस्त करणे, शेतीची सफाई करणे इत्यादी कामे जवळपास संपविली होती. मृग लागला की पर्हे टाकायचे या तयारीत शेतकरी होते. परंतु शेतकर्यांना पर्हे टाकण्यासाठी जमिनीची नागरणी करणे आवश्यक असते. अशात प्रत्येक शेतकरी पावसाची वाट बघत होता.मृगाच्या सुरुवातीला एकदा तरी पावसाने हजेरी लावावी, अशी अपेक्षा करीत होते. दमदार पाऊस झाल्याने सगळ्या शेतकर्यांची कामे सुरु झाली. प्रत्येक शेतकरी धान खरेदी करुन किंवा मागील वर्षीचे ठेवलेले बियाणे वापरुन पेरणी करीत आहेत.