। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात भातशेतीच्या कामांना शेतकर्यांनी सुरुवात केली आहे. भाताची पेरणी करण्यासाठी शेतकरी वर्ग कामाला लागला असून शेतकर्त्यांकडून भाताची राब भारणीसाठी नांगर आणि ट्रॅक्टर तसेच पॉवर ट्रिलर यांच्या माध्यमातून भाताची पेरणी करण्यावर शेतकर्यांनी भर दिला आहे. तर काही शेतकर्यांनी भाताची लागवड करण्यासाठी अवजारे यांचा देखील वापर सुरु केला आहे.
अनेक बदल झाले तरी भाताच्या राबांची कामे ही प्रामुख्याने नांगराचे सहाय्याने करण्यावर शेतकर्यांचा भर दिसून येत आहे. त्यामुळे शेतीमध्ये कितीही बदल झाले तरी पारंपरिक भाताची लागवड करण्यावर शेतकरी आपला विश्वास दाखवत आहेत हे सध्या जागोजागी दिसून येत आहे.
कर्जत तालुक्यात भाताची शेती करण्यासाठी शेतकरी लगबगीने शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. तालुक्यात शेतकरी भाताचे राब भरणी करण्याची कामांना गती दिली आहे. त्यासाठी बैलजोडीसह नांगर शेतात फिरताना दिसत आहेत. शेतकरी हे नांगर वापरून भाताचे रोप टाकण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. त्याबद्दल शेतकरी हेमंत कोंडिलकर यांनी नांगरामुळे जमिनीची उखळण चांगली होत असते. नांगराचे फाळ हे जमिनीत खोलवर जाते आणि त्याचा फायदा जमीन भुसभूशीत होण्यासाठी होत असतो. त्यामुळे नांगर वापरून नांगरणी केल्यास भाताचे बियाणे हे जमीन मध्ये खोलवर जाते आणि त्या बियांना पक्षीदेखील खाऊ शकत नाहीत. त्यामुळे बैलजोडी सह नांगरणी महत्वाची ठरत आहे, असे सांगितले.