तात्काळ पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यामधील 90 टक्के शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली असून, पूर्ण संपूर्ण कापणीसाठी आलेले भात जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वर्षातून एकदाच भाताचे पीक घेतले जाते. त्यातच संपूर्ण शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत ही अशी जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. तालुक्यातील सहा मेपासून सुरू झालेला पाऊस आज सगळ्यात न थांबल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती लावली नाही, परंतु ज्यांनी लावली आहे त्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. दरम्यान, कर्जत तहसीलदार यांच्याकडून महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांची बैठक घेऊन उद्यापासून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
कर्जत तालुक्यात दोन दिवस वादळी वारे आणि सोबत आलेला पाऊस यामुळे भाताच्या शेतीमध्ये उभे असलेले पीक संकटात आले आहे. भाताचे पीक शेतामध्ये कोसळले असल्याने भाताची शेती करणाऱ्या बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत अशी मागणी कर्जत तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी केला आहे. त्यानंतर कर्जत तहसीलदार यांच्याकडून भाताच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. त्यासाठी आज कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी कर्जत तालुक्यातील कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांची बैठक घेतली. त्या बैठकीत भात पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी गावपातळीवर टीम तयार करण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार यांच्याकडून देण्यात आली. गाव पातळीवर तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहायक या तिघांची टीम पंचनामे शेतात जाऊन करणार आहेत.
अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन सरसकट पंचनामे करावे सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, ही आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे.
चंद्रकांत जाधव,
पोलीस पाटील
दरवर्षी आमच्या शेतीचे असे नुकसान होते. परंतु, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. तहसीलदारांनी महसूल खात्याला आदेश देऊन पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्याला भरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे.
मोरेश्वर जाधव,
शेतकरी
