| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून भात कापणीला सुरुवात झाली आहे. कापणीनंतर दसऱ्याचा मुहूर्त साधून शेतकऱ्यांनी बांधणीला सुरुवात केली आहे.
भात कापणीनंतर आता शेतकऱ्यांची बांधणीची लगबग सुरु झाली आहे. दसऱ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊन पूजा करून बांधणीला सुरुवात केली. यावेळी सुखसमृध्दी व भरभराटी येवो असे साकडे बळीराजाकडून घालण्यात आले.सकाळी दहा वाजल्यापासून बांधणीची कामे तालुक्यात ठिकठिकाणी सुरु झाली. अलिबाग तालुक्यात सुमारे 13 हजार 322 हेक्टर क्षेत्रात भात लागवड केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून कापणीला सुरूवात झाली आहे. येत्या पंधरा दिवसात कापणीची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही ठिकाणी झोडणीची कामे तर काही ठिकाणी भाताची उडवी रचण्याचे काम केले जाणार आहे. बांधणीसाठी कामगार मिळत असल्याने या कामाला वेग येऊ लागला आहे.
कापणी गेल्या चार दिवसापूर्वी केली. दसऱ्याचा मुहूर्त साधत बांधणीची कामे सुरु केली आहे. यंदा भाताच्या पिकाला बहर चांगला आला आहे. त्यामुळे उत्पादन अधिक मिळण्याची शक्यता आहे.
गजानन गावंड, शेतकरी, वावे