मुरुड तालुक्यात भात कापणीची लगबग

पावसाच्या सावटामुळे बळीराजा चिंताग्रस्त

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

मुरूड तालुक्यातील भातशेतीचे पीक पूर्ण तयार झाले असून, ठिकठिकाणी भातकापणी आणि बांधणीची लगबग सुरू आहे. यंदा भातपीक उत्तम आले असून, शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळेल असे दिसून येत आहे. ओडिशामधील दाना वादळाचा परिणाम महाराष्ट्रात कोकण आणि अन्य भागात होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने बळीराजा पावसाच्या सावटामुळे चिंताग्रस्त आहे. मुरुडमधील बहुतांश शेतकर्‍यांना भातपिकाची कापणी पुढे ढकलावी, असे वाटत आहे. तापमान वाढलेले असल्याने पाऊस येणार असे अनुमान ज्येष्ठ शेतकरी आणि मच्छिमारांनी व्यक्त केले आहे.

मुरूड तालुक्यातील शिघ्रे, तेलवडे, वाणदे, खारआंबोली, विहूर, मजगाव, नागशेत, वावडुंगी, नविवाडी, गोयगान, उंडरगाव, टोकेखार, उसडी, नांदगाव, जमृतखार, नांदला, चिंचघर, मिठागर, सावली, काशीद, सर्वे, बोर्ली मांडला, बारशिव, दांडे, वाळवटी, उसरोली, आदाड, साळाव आदी विविध गावची भातशेती बहरली असून, कापणीसाठी पूर्ण तयार असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले. टोकेखार येथील पोलीस पाटील आणि शेतकरी कृष्णा रामजी माळी यांनी सांगितले की, आमच्या पंचक्रोशीत हळवी, गरवी पिके घेतली जातात. भातशेती मुख्य व्यवसाय असून, 80 टक्के ग्रामस्थ शेतकरी आहेत. 20 टक्के ग्रामस्थ नोकरीसाठी मुंबईत असतात. तालुक्यात सुवर्णा, चिंटू, जया, मसुरी, 40 नंबर कोलम आदी प्रकारातील भातपीक घेतले जाते. येथे जिरायती जमिनीवर 70 टक्के भात क्षेत्र आहे. आगरदांडा ते इंदापूर महामार्गावर ही गावे वसलेली आहेत. अर्धलीने शेती करण्याची परंपरा येथे आहे.

मुरूडजवळील शिघ्रे, खारआंबोली, वाणदे, उंडरगाव तेलवडे वावडुंगी, नागशेत आदी पंचक्रोशीतील भातशेती दसर्‍याच्या वेळीच तयार झाल्याचे जेष्ठ शेतकरी तुकाराम पाटील( वाणदे), रघुनाथ माळी (शिघ्रे) यांनी सांगितले. यंदा भातपीक दसर्‍याला पूर्णतः तयार झाले असून, मिळतील तसे मजूर घेऊन युद्धपातळीवर कापणी आणि शेतात बांधणी करण्यासाठी मोठी लगबग सुरू आहे. भातपीक तयार झाल्यावर वेळेवरच कापणी करावी लागते अन्यथा भात मोडून कणी जास्त होऊ शकते, अशी माहिती रघुनाथ माळी आणि तुकाराम पाटील यांनी दिली. सध्या भात कापून शेतात पसरवून ठेवले जात आहे. नंतर गोलाकार मळणी रचली जाते. पावसावर येथील पारंपरिक भातशेती अवलंबून असून मजुरी महागली असून, मजुरीने माणसं मिळणेदेखील दुरापास्त होत आहे. सकाळी दवबिंदू पडत असले तरी दुपारी कडक उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. अनेक शेतकर्‍यांना पावसाची भीती सतावत आहे.

Exit mobile version