रोह्यात भात कापणीला सुरुवात

। कोलाड । वर्ताहर ।

रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात भात शेतीच्या कापणीला दसर्‍यानंतर सुरुवात केली जाते. परंतु, यावर्षी 13 ते 26 ऑक्टोबर पर्यंत वीज वार्‍यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे भातशेती आडवी झाली होती. यामुळे पाऊस पुर्णपणे थांबल्यावर दिवाळी नंतरच भात कापणीला खर्‍या अर्थाने सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, यात भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

रायगड जिल्ह्यासह कोलाड-खांब परिसरात प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. परंतु, पाऊस लांबल्याने भात पिक भुईसपाट झाला आहे. थोडेफार वाचलेले भात पिक वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची भात कापणीची लगबग सुरु झाली आहे. यावर्षी रायगड जिल्ह्यात 96 हजार हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात आली होती. यामध्ये सुवर्णा, कोलम, रत्ना, व इतर भात पिकांना शेतकर्‍यांनी प्राधान्य दिले होते. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस उत्तम प्रकारे झाला व भात पिक ही चांगले आले. परंतु, परतीचा पाऊस लांबल्यामुळे भात पिके आडवी झाली. तसेच, भात कापणी नंतर दोन ते तीन दिवस ऊन देणे आवश्यक असते. यानंतर भारे बांधून मळणी रचली जाते. यामुळे भाताच्या दाण्याला ऊब मिळते व भाताचा दाणा खरडण्यास मदत होऊन तांदूळ उत्तम प्रकारे मिळते. परंतु, आता निसर्गाचा नियम बदलत चालला असुन पावसाच्या भीतीमुळे भात कापणी लांबणीवर जात असून शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

Exit mobile version