नागोठणे परिसरात भातकापणीची लगबग

मजुरांची कमतरता

। सुकेळी । प्रतिनिधी ।

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जवळपास ऑक्टोबर महिना संपत आला तरी पावसाचा हाहाकार सुरुच होता. पंरतु, चार ते पाच दिवसांपासून सर्वत्र पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण रोहा तालुक्यासह नागोठणे परिसरामध्ये शेतकऱ्यांची भातकापणीची लगबग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

परतीच्या पावसाने शेतातील भाताची रोपे ही जमिनीवर आडवी पासून सर्वत्र विखुरली आहेत. त्यामुळे भातकापणी करतांना मजुरांचे अक्षरशः कंबरडे मोडत आहेत. भातकापणी करतांना शेतामध्ये पुन्हा नव्याने उगवलेले भाताचे कोंबदेखिल अडथळे ठरत आहेत. ज्या ठिकाणी भातकापणीसाठी दोन ते तीन दिवस लागायचे त्या ठिकाणी भातकापणी करण्यासाठी आठ ते दहा दिवस लागत आहेत. त्यातच भातकापणीसाठी लागणाऱ्या मजुरांची कमतरता भासत आहे.

बहुतांशी आदिवासी मजूर हे दरवर्षी आपआपल्या शेतीची कामे पूर्ण करुन दुसरीकडे मजुरीसाठी जातात. पंरतु, यावेळी यावेळी मात्र उशिरापर्यंत सुरू राहीलेल्या पावसामुळे भातकापणीची कामे ही सगळ्यांचीच सोबत निघाल्यामुळे मजुरांची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यातुनच जरी मजुरकर मिळाले, तरी 500 ते 600 रु. एका माणसाची मजुरी, दोन वेळचे जेवण व चहा पाण्यासाठी आणखी वेगळे पैसे, असा मोठ्या प्रमाणात खर्च शेतकऱ्यांना मजुरांवर करावा लागत आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणारी बी-बीयाणे, मजुरांचा खर्च व परतीच्या पावसाचा बसलेला फटका अशा सर्व गोष्टींचा विचार करता यापुढे शेती करायची की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.

Exit mobile version