भातगिरणी कार्यालयाचे स्व. म. ता. ठाकूर सभागृह नामकरण

| नागोठणे | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात जुनी तसेच सद्यस्थितीत सुरळीत सुरू असलेली नागोठणे विभाग सहकारी भात गिरणी मर्यादित नागोठणे या संस्थेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या कार्यालयाचे नामकरण नुकतेच संस्थेचे तत्कालीन सभापती तसेच संस्थेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले स्व.म.ता.ठाकूर साहेब सभागृह असे करण्यात आले आहे. नागोठणे विभाग सहकारी भात गिरणी ही संस्था स्थापन करण्यामध्ये मुलचंद मोदी यांच्यासह स्व.म.ता.ठाकूर यांचा मोलाचा वाटा होता. परिसरातील शेतकरी बांधव त्यावेळी आपला भात व्यापाऱ्यांना अल्प दरात विकायचे. यावेळी कष्टकरी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत होते. या गोष्टीचा विचार करून स्व.म.ता.ठाकूर साहेबांनी त्यावेळी शासन दराने शेतकऱ्यांना भाताला भाव मिळावा यासाठी भात विक्री केंद्र सुरू केले. नागोठणे, वाकण, बेणसे या परिसरात भात विक्री केंद्रांचा विस्तार केला. त्यातून शेतकरी बांधवांना आपल्या भाताला योग्य भाव तर मिळालाच परंतु यातून अनेकांना रोजगारही प्राप्त झाले.सुरुवातीला अनेक कठीण प्रसंग आले त्यावर मात करत ठाकूर यांनी संस्थेची भरभराटीसाठी प्रयत्न केले. त्यांना मुलचंद मोदी, शंकर जांबेकर, तात्यासाहेब टके, विठ्ठल देवरे, दगडू म्हात्रे, नारायण देवरे,अंबाजी लाड, सजनाजी धामणे, नारायण शेळके,आण्णा चंदने, देवराम लाड,समद अधिकारी, मारुती देवरे, मधुकर ठमके, शिवराम शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. त्यामुळे विविध प्रसंगातून आपला ठसा उमटविणाऱ्या हरहुन्नरी नेतृत्वाची आठवण स्मरणात राहावी म्हणून संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सूचक चंद्रकांत भोईर व अनुमोदक ॲड. महेश पवार यांच्या ठरावानुसार भात गिरणी कार्यालयाचे स्व.म.ता.ठाकूर साहेब सभागृह असे नामकरण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सल्लागार समिती सदस्य शिवराम शिंदे, सभापती प्रभाकर ठाकूर, संचालक सदानंद गायकर, चंद्रकांत गायकवाड, बाळासाहेब टके, हिराजी शिंदे, चंद्रकांत जांबेकर, रामचंद्र देवरे, मंदाकिनी विलास गोळे यांच्यासह संस्थेचे सभासद ॲड. महेश पवार, चंद्रकांत भोईर, अनंत पाटेकर, अनिल पवार, रामचंद्र देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version