कर्जत येथील प्रकल्प भात जाती आणि वाणासाठी मैलाचा दगड ठरणार : डॉ. पराग हळदणकर
। कर्जत । प्रतिनिधी ।
कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत येथील भात संशोधन केंद्रात भात पैदास आणि वाण यांची अधिक प्रमाणात निर्मिती व्हावी यासाठी मुख्यमंत्री कृषी संशोधन केंद्र सुरू होत आहे. या संशोधन संरचना प्रकल्पामुळे कर्जत भात संशोधन केंद्राची व्याप्ती वाढणार असून, भाताचे वाण शोधण्यातदेखील हे केंद्र आघाडीवर येण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, असे उद्गार कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन कृषी संचालक डॉ. पराग हळदणकर यांनी काढले.
मुख्यमंत्री कृषी संशोधन केंद्र यांच्या अंतर्गत प्राप्त निधीमधून कर्जत येथील भात संशोधन केंद्रात भात जातींची जलद पैदास आणि वाणांच्या चाचण्यांबाबत संशोधन संरचना उभारणी प्रकल्प उभारला जात आहे. गतिमान पैदास प्रक्षेत्रावरील नियोजित स्थळी श्रीफळ वाढवून या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे, तसेच विविध विभागाचे शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे दक्षिण आशियातील विभागीय केंद्र असलेले वाराणसी, तामिळनाडूमधील कोईमतूर अशा मोजक्या केंद्रात हा प्रकल्प सुरू आहे. महाराष्ट्रात कर्जत येथे रुपये 441 लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर झाल्याने भात संशोधनाला निश्चित नवी दिशा मिळणार आहे.
याप्रसंगी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर यांनी देशातील मोजक्याच जलद पैदास संशोधन केंद्रामध्ये कर्जतचा समावेश आहे. ही गौरवाची बाब असून, या तंत्रज्ञानामुळे भात जाती संशोधनात लागणारा कालावधी कमी होऊन जनतेच्या गरजेनुरूप वाण संशोधन करण्यास मदत होणार आहे. त्याचवेळी भात पैदास आणि वाण निर्मितीमध्ये चालना मिळून विद्यापीठाच्या नावलौकिकात निश्चित भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर, सहयोगी संशोधक डॉ. वाघमोडे यांच्या नेतृत्वात संशोधन केंद्राचा झपाट्याने कायापालट होत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. भात हे उसापेक्षा कमी पाणी लागणारे पीक असून, त्यामुळे जमिनीत पाणी टिकून राहते. परिणामतः कोकणात शेतकर्यांच्या आत्महत्या नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नियोजित वेळेपूर्वी हा प्रकल्प पूर्ण व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय भावे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, नियंत्रक जोईस, विद्यापीठ अभियंता पूजा इंगवले (देसाई) यांनी या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आहेत.