रोह्यात भात झोडणीला वेग

कष्टाचं सोनं पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ

| चणेरा | प्रतिनिधी |

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कपाळावर चिंता उमटली होती. आधीच पिके तयार असूनही पावसाच्या सरींनी कापणी आणि झोडणीचं काम थांबवून ठेवलं होतं. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे पुन्हा एकदा शेतात जिवंतपणा आला आहे. शेतकरी उरलं-सुरलं कष्टाचं सोनं पदरात पाडून घेण्यासाठी धावपळ करताना दिसून येत आहे.

धाटाव, कोलाड, खांब, पुगाव, किल्ला, घोसाळे, चणेरा, भालगाव, यशवंतखार, तांबडी, वाली यांसारख्या गावांमध्ये भात झोडणीला आता वेग आला असून, सर्वत्र ओलसर मातीचा सुगंध आणि धान्याचा सुवास पसरला आहे. शेतकरी सकाळच्या पहाटेपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबत आहेत. दांडी, पिंप आणि वाऱ्याच्या झुळकीत झोडल्या जाणाऱ्या धान्याचा सोनेरी पाऊस पाहून त्यांच्या डोळ्यांतील थकवा हरवतोय. लांडर गावचे शेतकरी संकेत खेरटकर यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात सततच्या पावसाने भात सडण्याची भीती वाटत होती. पण, आता हवामान खुलं झालंय, त्यामुळे झोडणीला सुरुवात केली. उरलेलं कष्टाचं सोनं वाचवायला मिळालं हेच आमचं समाधान आहे.

पावसाचं थैमान थांबल्यानंतर ग्रामीण भागात पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं आहे. मेहनतीच्या घामातून उमलणारं हे सोनं म्हणजे त्यांच्या वर्षभराच्या परिश्रमाचं खऱ्या अर्थाने ‌‘सोनेरी फळ’ ठरत आहे. हवामान असंच खुलं राहिल्यास या हंगामात शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं सोनं हातात पडेल, अशी आशा तालुक्यात व्यक्त होत आहे.

Exit mobile version