| खांब | वार्ताहर |
उन्हाळी हंगामातील भात झोडणीची कामे अंतिम टप्प्यात आली असल्याचे चित्र आहे. रोहा तालुक्यातील डोलवहाल येथील बंधार्याच्या पाण्यातून कालव्याच्या सहाय्याने तालुक्यातील काही भागात उन्हाळी हंगामासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच पाण्यावर आधारित भात लागवड केली जाते. उन्हाळी हंगामातील भातशेतीतून मिळणारे पीक शंभर टक्के चांगला परतावा देत असल्याने या हंगामातील भातशेती ही परवडणारी असते. परंतु, शेती क्षेत्रावर येत असलेली विविध संकटे पाहता शेती परवडत नसल्याची शेतकरीवर्गाची ओरड आहे. असे असले तरी काही शेतकरीवर्गाचे अर्थार्जनाचे हेच साधन असल्याने तसेच पारंपरिक व्यवसाय करण्याकडे शेतकरीवर्गाचा कल असल्याने शेती पिकविली जाते.
मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतीचे नुकसान केले. अशा परिस्थितीत झोडणी, मळणीची कामे जलदगतीने व्हावी यासाठी वाटेल तेवढी मजूरी देऊन प्रसंगी घरातील सर्वच माणसांच्या सहकार्याने शेतकरीवर्गाने आपापल्या शेतीतील कामे उरकून घेतली. सद्यस्थितीत आहे ते पदरात पाडण्यासाठी शेतकरीवर्गाची एकच धावपळ सुरू झाली असून भात झोडणीची कामे अंतिम टप्प्यात आली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.