शेतकर्यांकडून समाधान व्यक्त
| खांब-रोहा | वार्ताहर |
उन्हाळी हंगामात कालव्याच्या पाण्यावर आधारित पिकविली जाणारी भातशेती चांगलीच बहरल्याने शेतकर्यांच्या चेहर्यावर समाधान दिसत आहे.
रोहा तालुक्यातील डोलवहाळ बंधार्याच्या माध्यमातून कालव्यातील पाण्याच्या सहाय्याने काही भागात ऊन्हाळी हंगामातील भातशेती पिकविली जाते. उन्हाळी हंगामातील भातशेतीचे पीक हे शेतकरीवर्गाचे हातात असल्याने ते त्यांना चांगले परवडते. तर, कालव्याच्या माध्यमातून शेतीला आवश्यक पाणीपुरवठा केला जात असल्याने पाण्याचेही योग्य प्रकारे नियोजन करून आपल्याला आवश्यक असणारी पिके सहजपणे पिकविली जातात.
साधारणपणे डिसेंबर महिन्यात कालव्याचे पाणी उपलब्ध झाले तर 90 ते 120 दिवसात भातपिके तयार होऊन कापणीलायक होतात. तर कधी पाणी उशिरा मिळाले तर पहिल्याच येणार्या मोसमी पावसामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता असते. परंतु, यावर्षी पाटबंधारे विभागाकडून योग्य वेळेत पाण्याचे नियोजन झाल्याने भातशेतीही योग्य पद्धतीशे बहरल्याने शेतकरी समाधानी दिसत आहे. तर, अधूनमधून दिसणार्या ढगाळ वातावरणामुळे अवकळी पावसाची टांगती तलवारही त्यांच्या डोक्यावर कायम आहे.
दिवसेंदिवस वाढणारी महागाई यामुळे उन्हाळी भातशेती पिकविणेदेखील मोठे कष्टाचेच झाले असल्याने आपली वडिलोपार्जित शेती पिकवूण ती टिकवून ठेवणे व परंपरागत व्यवसाय चालविणे याच उद्देशाने शेतकरी उन्हाळी हंगामातील भातशेतीकडे लक्ष देत असताना दिसत आहे.