अनधिकृत भाड्याच्या दुचाकींमुळे रिक्षा व्यावसायिक अडचणीत

। अलिबाग । प्रतिनिधी ।

बाईक ऑन रेंट या व्यवसायाला मान्यता नसल्याचे पेण येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने सांगितले आहे. तरीदेखील हा व्यवसाय अलिबागमध्ये राजरोसपणे सुरू आहे. अनधिकृत रेंटबाईकमुळे रिक्षा व्यवसायिक अडचणीत आले आहेत. बेकादेशीर व्यवसायाविरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी केली जात असताना ती होत नसल्याची खंत रिक्षा व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.

अलिबाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे असताना ऐतिहासिक ठिकाण म्हणून अलिबागची एक वेगळ ओळख आहे. अलिबागला फिरण्यास येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढत आहे. अलिबागसह काशिद, मुरुड, नागाव, किहीम , आक्षी, रेवदंडा, या समुद्र किनारी पर्यटकांची वर्दळ कायमच राहिली आहे. वाढत्या पर्यटनामुळे अलिबागमधील रिक्षा व्यवसायाला रोजगार उपलब्ध होत आहे. तालुक्यात एक हजार 200 हून अधिक रिक्षा आहेत. यातील अनेकांनी कर्ज काढून रिक्षा घेतल्या आहेत .

परंतू अलिबागमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ‘बाईक ऑन रेंट’ हा व्यवसाय सुरू झाला आहे. सुमारे 22 ठिकाणी हा व्यवसाय सुरू असून याचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. दुचाकी पर्यटकांना दुचाकी भाड्याने देण्याची दुकाने गॅरेज, काही हॉटेल परिसरात खुलेआम सुरू आहेत .उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या म्हणण्यानुसार या व्यवसायिकांनी परवाने काढली नाहीत . कोणतीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे हा व्यवसाय अनधिकृत असल्याचे सांगण्यात आले आहे.रेंट बाईकमुळे रिक्षा व्यवसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्याचा व्यवसायावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे , कर्ज फेडणे कठीण होऊन बसले आहे. रेंट बाईकचाअनधिकृत व्यवसाय बंद करण्यात यावा अशी मागणी अलिबागच्या रिक्षा चालक , मालकांनी केली आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग , वाहतूक शाखा व अलिबाग पोलीसांना निवेदही दिले आहे. परंतु त्यांच्या विरोधात कारवाई केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रेंट बाईकचा व्यवसाय अनधिकृत आहे त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नाही, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळाली. वेगवेगळ्या विभागाकडे लेखी तक्रार केली. परंतू आम्हाला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही.

शरद राऊत
अध्यक्ष
अलिबाग ऑटो रिक्षा व्यवसायिक संघटना
Exit mobile version