ट्रेलरच्या धडकेत रिक्षाचालक ठार

| उरण | प्रतिनिधी |

तालुक्यातील जेएनपीटी पोलीस ठाण्याजवळील पुलाखाली झालेल्या भीषण अपघातात जसखार गावातील रिक्षाचालक किसन सुकीर ठाकूर (40) यांचा ट्रेलरखाली चिरडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या मुलीचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आले असताना कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलावरून उतरत असलेल्या कंटेनर ट्रेलरचा ताबा चालकाकडून सुटल्याने त्याने पुढे जाणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा पुढे उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रेलरखाली घुसून चिरडली गेली. अपघात इतका भीषण होता की, किसन ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने रिक्षामध्ये अन्य प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघाताचे स्वरूप अत्यंत भीषण होते.

दरम्यान, अपघातातील ट्रेलरवर क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेला होता. दोन कंटेनर लोड केल्यामुळे वाहनाचे संतुलन बिघडून चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बंदरातून ओव्हरलोड वाहतूक होत असल्याची बाबही यानिमित्ताने समोर आली आहे. तसेच ट्रेलर चालकांकडून दीर्घकाळ वाहन चालवले जात असल्याने थकवा, उष्णता आणि अपुऱ्या विश्रांतीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा आहे. काही चालकांकडे वैध परवाने नसल्याची किंवा बोगस परवाने वापरले जात असल्याची माहितीही समोर येत आहे.

याप्रकरणी न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी अपघाताची माहिती देत संबंधित ट्रेलर चालक फरार झाल्याचे सांगितले. ट्रान्सपोर्ट मालक बाहेरचा असल्याने त्याच्याशी संपर्क साधण्यात येत असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, ट्रेलर व चालकांची संपूर्ण माहिती संबंधित यंत्रणांकडे उपलब्ध असावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच ओव्हरलोडिंगवर कठोर कारवाई, चालकांच्या परवान्यांची तपासणी आणि वाहनांची नियमित पाहणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. उरण तालुका मराठी पत्रकार संघानेही या गंभीर प्रकारावर आवाज उठवण्याचा इशारा देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Exit mobile version