कारचालकाच्या दमदाटीमुळे रिक्षाचालकाची आत्महत्या

| ठाणे | प्रतिनिधी |

डोंबिवलीमधील मोठागाव परिसरात मंगळवारी संध्याकाळी मुंजाजी शेळके (70) यांच्या रिक्षाचा एका कारला धक्का लागला. यानंतर कारचालक आकाश म्हात्रे यांनी दमदाटी करत मुंजाजी शेळके यांना स्वतःच्या घरी नेऊन डांबून ठेवले होते. भरपाई म्हणून रिक्षा चालकाकडे दोन लाखाची मागणी केली. पैसे घेऊन ये आणि रिक्षा घेऊन जा, असा दम देत मध्यरात्री शेळके यांना सोडून दिले. शेळके यांनी घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. आर्थिक नुकसान, रिक्षा जप्त केल्याची स्थितीचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. या तणावातून शेळके यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मुंजाजी शेळके यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीय, नागरिक आणि रिक्षाचालकांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यावर धडक दिली. आकाश म्हात्रेविरुद्ध कारवाईची मागणी करत ठिय्या दिला. यानंतर पोलिसांनी आकाश म्हात्रे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

Exit mobile version