एसटी स्थानकासमोरील खड्डे रिक्षाचालकांनी भरले

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

पाली येथील एस.टी. बस स्थानकासमोरील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, प्रवासी तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.

विशेषतः एस.टी. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील या खड्ड्यांमुळे बस, रिक्षा आणि इतर वाहनांना अपघाताचा धोका वाढला होता. बस खड्ड्यात अडकणे किंवा तोल जाऊन दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत होते. ही बाब लक्षात घेऊन पालीतील रिक्षाचालकांनी कोणाचीही वाट न पाहता स्वतः पुढाकार घेत श्रमदानातून हे खड्डे भरून वाहतूक सुरळीत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. त्यांच्या या कार्यामुळे अनेक वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, सर्व स्तरांतून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले जात आहे.

एस.टी. स्थानक परिसरातील रस्त्यांची सुरक्षितता आणि देखभाल ही संबंधित यंत्रणांची सामूहिक जबाबदारी मानली जाते. अशा ठिकाणी उद्भवणाऱ्या समस्यांकडे नगरपंचायत तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी समन्वयाने लक्ष देणे अपेक्षित आहे. मात्र, खड्ड्यांची दुरुस्ती वेळेत न झाल्याने अखेर रिक्षाचालकांनाच पुढाकार घ्यावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Exit mobile version