मुजोर रिक्षाचालकांना बसणार लगाम

परिवहन अधिकाऱ्यांचे तक्रारी नोंदवण्याचे आवाहन

। माथेरान । वार्ताहर ।

कर्जतमधील काही रिक्षाचालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. काही प्रवाशांना तर अरेरावीला सामोरे जावे लागत आहे. त्यात अवाजवी दर आकारून प्रवाशांची लूट केली जात आहे. या सर्व प्रकारांविरोधात कर्जत मधील नारी शक्ती संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहनचे अधिकारी अनिल पाटील यांना निवेदन देऊन संबंधित रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर अनिल पाटील यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचे संकेत दिले असून प्रवाशांनी तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले आहे.


कोरोनाकाळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. त्या दरम्यान अनेकांनी रिक्षा घेऊन उपजीविकेचे साधन निर्माण केले. त्यांनी जुन्या रिक्षा विनापरवाना घेतल्या. त्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाला कळवले नाही. अशा सर्वांकडे परवाने, बिल, अंगावर युनिफॉर्म नाही. या शिवाय अनेक रिक्षाचालक गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा अन्य ठिकाणांहून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांकडून अवास्तव दर आकारत आहे. यामुळे येथे अनेक प्रवासी नाराजी दर्शवत आहेत. जे रिक्षा चालक योग्य दराने प्रवासी घेऊन जातात त्यांच्या बरोबर अन्य रिक्षाचालक भांडण करतात, त्यांना धमकावण्याचे काम करतात. हे सर्व जण नियम पायदळी तुडवत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी संघटनेच्या अध्यक्ष ज्योती जाधव यांनी अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. किलोमीटरप्रमाणे दर फलकावर नोंद करून ठेवावी, अशी मागणी देखील केली आहे.

रिक्षाचालकांबाबत तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी नगरपालिकेने प्रवाशांच्या सतर्कतेसाठी 9004670946 या टोल फ्री क्रमांकाचे फलक मुख्य ठिकाणी लावून नागरिकांना जागृत केले पाहिजे. रिक्षा चालकाविरोधात आलेल्या तक्रारीवर लवकरच योग्य कारवाई करण्यात येणार आहे.

अनिल पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल
Exit mobile version