लोखंडी रॉडने जबर मारहाण
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरात पूर्ववैमन्यस्यातून तरुणांना भररस्त्यात मारहाण करण्यात आली. दबा धरुन बसलेल्या तरुणांनी गाडीत लपवून ठेवलेल्या लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण करीत एकास रक्तबंबाळ होईपर्यंत जखमी केले, अन्य दोघे जीव वाचविण्याच्या आकांताने पळून जाण्यात यशस्वी ठरल्याने मोठा अनर्थ टळला आहे. कर्जत पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बहुजन विद्यार्थी संघटनेचे ऋत्विज सुनील आपटे हे आपले मित्र अनिल वाणी यांच्यासह (दि.12) कर्जत उपजिल्हा रुग्णालयात माहिती अधिकाराबद्दल चर्चा करण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून कर्जत नगरपरिषद कार्यालयाकडे जात असताना, माझ्या स्कुटीसमोर तुझी गाडी का लावलीस, याची विचारणा करीत वाणी आणि आपटे काही तरुणाने थांबवले. दरम्यान, काही सेकंदात दोन-तीन तरुण तेथे धावत आले. त्यांनी उभ्या स्कुटीमधील लोखंडी रॉड काढत अनिल वाणी यांना मारहाण केली. त्यावेळी याठिकाणी उपस्थित असलेले देवघरे, पांगारे आणि वाघमारे यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांना आधीपासून दबा धरून बसलेले तरुण ऐकत नव्हते. त्यातील एकजण ऋत्विज आपटे यास ठार मारा, असे बोलत होते. आपल्या जीवाला धोका आहे याची कल्पना येताच आपटे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे, तर अनिल वाणी हे नगरपरिषद कार्यालयाकडे पळून जात होते. मात्र, त्यावेळी वाणी यांच्यामागे एक अनोळखी इसम धावत जाऊन मारहाण करीत होता, असे आपटे यांनी पोलिसात सांगितले आहे.
माहिती अधिकारात कर्जत उपजिल्हा रुग्णलयाची माहिती मागितली म्हणून मारहाण करण्याची घटना घडली असावी, असा संशय ऋत्विज आपटे यांनी कर्जत पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात लोखंडी रॉडच्या सहाय्याने झालेल्या मारहाणीबद्दल गुन्हा दाखल केला आहे.