रिक्षा भाडं 40रु आणि दंड 500रु !

मुरूड शहरात विनाकारण वाहतूक पोलिसांची वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई

| मुरूड | प्रतिनिधी |

मुरूड शहरात वाहतूक पोलिसांच्या विनाकारण दंडात्मक कारवाईला उत आला आहे. कधीही कोठेही उभ्या असलेल्या वाहनांचे फोटो काढून ई-चलनाद्वारे वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई वाहतूक पोलिस करीत आहेत. आता तर रुग्णांना दवाखान्यात घेऊन येणाऱ्या रिक्षा चालकांवर दवाखान्यासमोर रिक्षाचे फोटो काढून ऑनलाईन ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करुन वाहतूक पोलिसांनी हद्दच केली आहे. त्यामुळे 40 रुपयांचं भाडं व 500 रु दंड कस भरणार, असा प्रश्न रिक्षाचालक वसिम शेखानी यांना पडला आहे. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिक देखील या प्रकाराने संतप्त आणि हैराण झाले आहेत. खूप दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुरूड बाजारपेठेत, बॅंकेसमोर कोठेही नियमात वाहन उभे केले तरी मनात वाहन चालकांच्या भिंती निर्माण झाली आहे. कधी वाहतूक पोलिस फोटो काढून जाईल याचा नेम नाही व ई-चलनाचे मेसेज येण्याची भीती वाटत असते. त्यामुळे या वाहतूक पोलिसांच्या विनाकारण दंडात्मक कारवाईमुळे वाहनचालक पुरते हैराण झाले आहेत. विनाकारण दंडात्मक कारवाई करु नये. एखाद्या वाहन चालकाची चुकी असेल तर खुशाल कारवाई करा. विनाकारण वाहनचालकांना त्रास देऊ नये. अशी मागणी सर्व वाहनचालकांनी केली आहे.

माझी गाडी बाजारपेठेत पार्किंग मध्ये उभी असताना वाहतूक पोलिसांनी फोटो काढून नाहक 500 रु ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांना विनंती केली तरी ऐकून घेतले नाही. माझी काय चुकी आहे ते तरी दाखवा, तरी काही दाखवीले नाही.

जगदिप आंबुकर
वाहन चालक

आम्ही पोट कसे भरायचे? 40 रुपयाचे भाडे घेऊन रुग्णांना दवाखान्यात सोडण्यासाठी आलो तर रुग्ण गाडीतून उतरल्यावर या वाहतूक पोलिसांनी 500 रु ई-चलनाद्वारे माझ्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. 40 रुपयाचे भाडे आणि 500 रु दंड! आम्ही धंदा कसा करायचा व पोट कसे भरायचे? असा सवाल पडला आहे.

वसिम शेखानी
रिक्षा चालक
Exit mobile version