स्थानिक प्रवाशांच्या अडचणीत भर; ऑनलाईन बंदीचा दुहेरी फटका
| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
करंजाडे वसाहतीत ऑनलाईन रिक्षा बंद असा फलक लावल्यानंतर स्थानिक प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. आधीच सार्वजनिक प्रवासी सुविधा अपुऱ्या असताना या निर्णयामुळे चाकरमान्यांचा रोजचा प्रवास अधिकच कठीण झाला आहे.
करंजाडे परिसरात मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग वास्तव्यास आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी रिक्षांची संख्या अत्यल्प असल्याने रिक्षा थांब्यांवर लांबच लांब रांगा लागतात. अनेकांना बराच वेळ प्रतीक्षा करूनही रिक्षा मिळत नाही. परिणामी, कामावर वेळेत पोहोचण्यासाठी नागरिकांची धावपळ आणि मानसिक त्रास वाढला आहे.
यातच वाहतूक कोंडी मुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. पनवेल रेल्वे स्टेशन गाठताना प्रवाशांची अक्षरशः दमछाक होते. विशेषतः महिलांना सकाळी लवकर आणि रात्री उशिरा रिक्षा उपलब्ध नसल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सुरक्षिततेचा प्रश्नही यामुळे निर्माण झाला आहे. ऑनलाईन रिक्षांवरील बंदीमुळे नागरिकांकडे असलेला एक महत्त्वाचा पर्यायही बंद झाला आहे. त्यामुळे करंजाडेकरांचा प्रवास दिवसेंदिवस अधिक कठीण बनत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रिक्षांची संख्या वाढवावी, सार्वजनिक वाहतूक सुधारावी आणि ऑनलाईन रिक्षा बंदीचा निर्णय पुनर्विचार करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रवाशांचा रोजचा संघर्ष
करंजाडे परिसरात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी वास्तव्यास असले तरी रिक्षांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी रिक्षा थांब्यांवर लांबच लांब रांगा लागतात आणि अनेकांना वेळेत रिक्षा मिळत नाही. वाहतूक कोंडी आणि काही स्थानिक रिक्षा चालकांची दादागिरी यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनते. पनवेल स्टेशनपर्यंत पोहोचताना प्रवाशांची दमछाक होते. विशेषतः महिलांना सकाळी व रात्री रिक्षा न मिळाल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन रिक्षा बंदीमुळे उपलब्ध असलेला पर्यायही बंद झाल्याने करंजाडेकरांचा प्रवास अधिकच कठीण बनला आहे.
एनएमएमटी बस सेवा अपुरी असून, वेळेवर बस उपलब्ध नसतात. त्यामुळे अनेक प्रवासी ऑनलाईन रिक्षांचा पर्याय निवडतात. मात्र या सेवेलाच बंदी घातल्याने नागरिकांना अधिक वेळ थांबावे लागत असून, खासगी वाहन किंवा महागड्या पर्यायांकडे वळावे लागत आहे.
कुणाल वर्तक
नागरिक
आधीच बस सेवा कमी आहे, त्यात ऑनलाईन रिक्षांवर बंदी घालणे म्हणजे आमच्यावर अन्याय आहे. प्रशासनाने प्रवाशांच्या अडचणी समजून घेऊन या वर योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे.
सीमा कुलकर्णी
प्रवासी





