विद्यार्थी आणि पर्यटक प्रवाशांचे हाल
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यटन स्थळी शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांच्यासाठी पर्यावरणपूरक ई-रिक्षा चालवल्या जातात. मात्र, या रिक्षा चालण्यासाठी असलेले रस्ते हे दगड मातीचे असल्याने त्या सतत नादुरुस्त होत आहेत. दरम्यान, माथेरान शहरात असलेल्या 20 ई-रिक्षांपैकी सात ते आठ रिक्षा या नादुरुस्त असून, त्या दुरुस्त करण्यासाठी गॅरेज वाहनचालकांना चार्जिंग स्टेशन येथेच बनवावे लागले आहेत.
माथेरान शहरात 12 वर्षांच्या मागणीनंतर पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या. माथेरान शहरात सध्या 20 पर्यावरणपूरक ई-रिक्षा चालवल्या जात आहेत. त्यातील 15 ई-रिक्षा या शाळांच्या वेळेत विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जातात आणि अन्य वेळी ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि त्यानंतर प्रवासी पर्यटकांच्या वापरासाठी त्या वापरल्या जातात. मात्र, माथेरान शहरात डांबरी रस्ते नाहीत आणि त्यामुळे क्ले पेव्हर ब्लॉक तसेच लाल मातीच्या रस्त्यावरून या रिक्षा धावत असतात. सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत या रिक्षा चालवण्यास माथेरान नगरपरिषदेकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या ई-रिक्षा यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाल्या आहेत. तीन ई-रिक्षांवर झाडे कोसळली असून, एक रिक्षा तर प्रवाशांना घेऊन प्रवास करीत असताना त्या चालत्या गाडीवर झाड कोसळले होते. तर, चार्जिंगसाठी लावण्यात आलेल्या ई-रिक्षावरदेखील झाड कोसळून नुकसान होण्याचे प्रमाण सुरूच आहे.
त्यात आता भर पडली असून, माथेरानमध्ये असलेल्या रस्त्याने धावणाऱ्या ई-रिक्षांच्या दुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे. माथेरानमध्ये चालविण्यात येत असलेल्या ई-रिक्षांचे सर्विस सेंटर हे माथेरान शहरात नाही. तसेच माथेरानचे पायथ्याशी नेरळ येथे देखील नाही. तर या पर्यावरण पुरक ई- रिक्षा यांचे शो रूम पनवेल येथे असल्याने माथेरान शहरात नादुरुस्त असलेल्या ई- रिक्षा यांना पनवेल येथे नेणे शक्य नसते. त्यामुळे अनेक वाहनचालक हे आपल्या नादुरुस्त ई- रिक्षा यांना आपल्या गावातच चार्जिंग स्टेशन किंवा रस्त्याच्या बाजूला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यात माथेरान मध्ये कोणताही स्थानिक मेकॅनिक नाही आणि त्यामुळे होणारे दुरुस्तीचे काम करण्यात देखील अडचणी येत आहे. अशा आजच्या घडीला 20 पैकी तब्बल सात ई-रिक्षा या नादुरुस्त असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यात माथेरानमधील शाळा या दोन दिवस आधी पावसाळी सुट्टीनंतर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे 15 ई-रिक्षा राखीव ठेवण्याची कसरत रिक्षाचालकांना करावी लागत आहे. दरम्यान, या नादुरुस्त ई-रिक्षांमुळे माथेरानमध्ये त्यांची वाट अडखळत सुरू आहे.
माथेरानमध्ये सर्व हात रिक्षा चालकांना पर्यावरणपूरक ई-रिक्षा देण्याचा निर्णय सर्वोच्य न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे त्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. तर, सर्व हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा आल्यास वाहतूक आणखी सुलभ होईल.
सुनील शिंदे,
सचिव, श्रमिक ई-रिक्षा संघटना
