26 महिन्यात 236 जणांचा मृत्यू
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये 26 महिन्यामध्ये 236 जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती आकडेवारीनुसार उघड झाली आहे. विना हेल्मेट प्रवास करणे जीवघेणा ठरला आहे. त्यामुळे आता प्रवास करताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. रायगड पोलिसांमार्फत कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी हेल्मेट वापरून वाहन चालविण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात औद्योगिकरण झपाट्याने वाढत आहे. त्यात पर्यटन वाढीलादेखील चालना मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात नागरिकीकरण वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यामध्ये नोकरी व्यावसायाबरोबरच पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या प्रचंड झाली आहे. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे 25 हजारहून अधिक दुचाकी खरेदी केल्या जातात. त्यामुळे दुचाकीसह चारचाकी, तीन चाकी तसेच जेसीबी, व इतर वाहनांची वर्दळ वाढली आहे. लाखोच्या संख्येने जिल्ह्यात वाहने धावतात. मात्र, अनेकजण नियमांचे पालन न करता बेशिस्तपणे वाहने चालवितात. त्याचा परिणाम अनेक वेळा वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागले.
शनिवार व रविवारी तसेच अन्य सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यात पर्यटक येतात. यातील अनेक पर्यटक दुचाकी घेऊन फिरण्यासाठी येतात. तर स्थानिक नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी सर्रासपणे दुचाकीचा वापर करतात. मात्र, जिल्ह्यामध्ये नागरिक हेल्मेट न वापरता वाहन चालवित असतात. त्यामुळे अपघात होऊन डोक्यावर गंभीर दुखापत झाल्यावर जागेवर मृत्यू होण्याची भिती निर्माण झाली आहे. अपघातामुळे जागीत मृत्यू होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी रायगड पोलिसांनी पाऊल उचलले आहे.
मोटार अपघातामध्ये मयत झालेल्यांची संख्या अधिक आहे. विना हेल्मेट प्रवास केल्याने हा मृत्यू झाल्याचेआ कडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यामध्ये जानेवारी ते डिसेंबर 2024 या वर्षात 110, जानेवारी ते डिसेंबर 2025 मध्ये 104 असे 214 जणांचा मृत्यू झाला आहे. 2024च्या तुलनेने मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी या दोन वर्षात मृत्यूने शंभरी ओलांडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जानेवारी ते फेब्रुवारी 2026 या दोन महिन्यात 22 जणांचा विना हेल्मेट मृत्यू झाल्याची माहिती पोलीस दलाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे 2024 पासून ते आतापर्यंत या 26 महिन्यात हेल्मेट न वापरल्याने 236 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी रायगड पोलिसंनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. विना हेल्मेट वाहन चालविल्यास कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात विशेषतः महामार्गासह अन्य ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन रायगड पोलिसांकडून करण्यात आले असून ठिकठिकाणी फलक लावून जनजागृती करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.






