विद्यार्थ्यांच्या शाळेच्या खर्चासाठी मदत
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर चालविल्या जाणाऱ्या मिनीट्रेनमुळे नेरळ ते माथेरानदरम्यान असलेल्या मार्गावरील स्थानकात आदिवासी लोकांकडून जंगली मेवा विकला जातो. त्यातून या उन्हाळी पर्यटन हंगामात आदिवासी लोकांना चांगला रोजगार मिळाला असून, त्या ठिकाणी आपल्या आईसोबत जंगली मेवा विकायला मदत करणाऱ्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतदेखील उभी राहिली आहे.
मध्य रेल्वेच्या नेरळ-माथेरान-नेरळ या पर्वतीय मिनीट्रेनच्या या मार्गावरील प्रवास हा स्थानिक आदिवासींच्या रोजगाराच्या दृष्टीने महत्वाचा असतो. परीक्षा संपल्या की आदिवासी वाड्यांमधील विद्यार्थी आपल्या आईवडिलांसोबत मिनी ट्रेनच्या स्थानकात बसून मिनी ट्रेनमधून प्रवाशांना जंगली मेवा विकत असतात. हे नेरळ- माथेरान-नेरळ मार्गावर मिनी ट्रेन जेव्हापासून चालविली जात आहे, तेव्हापासून हे सुरूच आहे. शाळांना सुट्टी असल्याने विद्यार्थी हे आपला शैक्षणिक खर्च सोडविता यावा म्हणून किमान दोन महिने स्टेशनवर बसूनच असायचे. हे अनेक वर्षे सुरू असून मधल्या काळात नेरळ माथेरान मिनी ट्रेन मार्गाचे नुकसान पावसाळ्यात झाल्याने ती बंद होती आणि त्यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अन्य ठिकाणी रोजगार मिळवावा लागला होता.
मात्र ऑक्टोबर 2022 पासून मिनी ट्रेन नेरळ माथेरान नेरळ मार्गावर चालविली जात आहे. तेव्हापासून स्थानिक आदिवासी लोक मिनी ट्रेनच्या स्थानकात बसून जंगली मेवा विकून रोजगार शोधत आहेत. त्यात परशुराम बांगारे, भगवान दिपक डूमणे,दारकाबाई तुकाराम डूमणे, शेवंती मंगळ पारधी, शेवंता पांडुरंग डूमणे, अनुसया गोविंद सराई, ताई परशुराम बांगरे, द्रौपदी सखाराम बांगरे यांच्यासारखे अनेक कुटुंबांना मिनी ट्रेनने रोजगार दिला आहे. मिनी ट्रेन सुरु असल्याने आमच्या समाजातील मुलांना शाळेत जाताना नवीन कपडे घेण्यासाठी थोडे पैसे जंगलात मेवा विकून मिळाल्याची प्रतिक्रिया बेकरे वाडी येथील गणेश पारधी यांनी दिली.