विन्स्टन चर्चिल यांचा भारताला स्वातंत्र्य द्यायला विरोध होता. भारतीय लोक माणूस म्हणायच्या किंवा राज्य चालवण्याच्या लायकीचे नाहीत असेच जणू त्यांना म्हणायचे होते. अशी तुच्छता बाळगणार्या गोर्या इंग्रजांचा चर्चिल हे एक प्रतिनिधी होते. तुम साला गुलाम लोग हमारे जूती के नीचे रहेगा हे या लोकांचं अघोषित घोषवाक्य होतं. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याला 75 वर्षे होत असताना, ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याचा भारतीयांना आनंद होणं स्वाभाविक आहे. सुनक यांचे आजीआजोबा मुळात गुजरांवाला या शहरातून आफ्रिकेत स्थलांतरित झाल्याने पाकिस्तानी लोकदेखील त्यांच्यावर आपला हक्क सांगत आहेत. मुद्दा असा की ब्रिटनला आपला देश चालवायला आता भारतीय उपखंडातला एक माणूस लागणार आहे. तेही, ब्रिटीश वंशाची लिझ ट्रस नावाची पंतप्रधान महिला अवघ्या 45 दिवसात अपयशी ठरून तिला राजीनामा द्यावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर. दीड महिन्यांपूर्वी सुनक हेच ट्रस यांचे प्रतिस्पर्धी होते. कोरोनानंतर व सध्याची मंदी यामध्ये ब्रिटनची अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. चलनवाढीचा दर भारतापेक्षाही अधिक म्हणजे सुमारे नऊ टक्के आहे. पौंडाचा दरही डॉलरच्या तुलनेत घसरला आहे. सहा कोटींच्या देशातल्या पन्नास लाख लोकांच्या नोकर्या गेल्या दोन वर्षात गेल्या आहेत. अशा स्थितीत ब्रिटनमध्ये कर अधिक वाढवायला हवेत असे सुनक यांचे म्हणणे होते. तर श्रीमंतांवरचे कर कमी केले तर ते अधिक गुंतवणूक करतील असा ट्रस यांचा फंडा होता. दीड महिन्यांपूर्वी ब्रिटीश लोकांना ट्रसबाईंचा फंडा आवडला. त्या पंतप्रधान झाल्या. पण त्यातून अर्थव्यवस्था आणखी कोलमडली. शेवटी, सुनक यांनाच बिनविरोध नेतेपदी निवडण्याची वेळ ब्रिटनमधील हुजूर पक्षावर आली. बोरिस जॉन्सन यांच्या काळात अर्थमंत्री म्हणून देशापुढचे आर्थिक प्रश्न सुनक यांनी जवळून पाहिले आहेत. आता त्यांना त्यावरच्या उत्तरांची अंमलबजावणी करून दाखवायची आहे. सुनक यांचा रस्ता सोपा राहणार नाही. सुनक यांचे हिंदू व मूळचे भारतीय असणे, सध्या ते अतिश्रीमंत गटातले असणे, अलिकडपर्यंत त्यांनी अमेरिकी नागरिकत्व न सोडणे, त्यांची पत्नी व इन्फोसिसच्या नारायणमूर्तींची कन्या हिने वडिलांच्या कंपनीतून मिळणार्या लाभांश व इतर पैशांवर ब्रिटनमध्ये कर न भरलेला असणे (जरी की ते ब्रिटनच्या कायद्यानुसारच पूर्ण वैध होते) अशा गोष्टींवरून ऋषी यांच्यावर यापूर्वी टीका झालेली आहे. शिवाय अर्थव्यवस्था सावरण्यासाठी कर वाढवण्याखेरीज पर्याय नाही हे त्यांचे ठाम मत आहे. बहुसंख्य नागरिकांना ते आवडणारे नाही. एक तर ब्रिटनमधली महागाई कधी नव्हे इतकी कळसाला पोचलेली आहे. त्यात ही करवाढ झेलणे सोपे राहणार नाही. पण इंग्रजांच्या इंग्रजीतच देअर आर नो फ्री लंचेस म्हणजे कोणत्याही गोष्टी कधी फुकट मिळत नाही असं म्हणून ठेवलं आहे. ऋषी यांना सामान्य जनतेलाच नव्हे तर आपल्याच हुजूर पक्षाच्या लोकांनाही ते पटवून द्यावे लागणार आहे. ऋषी हे हिंदू असून अगदी नियमित देवळात वगैरे जाणारे आहेत. त्यामुळे आपल्या देशातील बहुसंख्य लोकांना त्यांच्याविषयी ममत्व वाटण्याचा संभव आहे. पण ऋषी यांना भारताविषयी असे ममत्व वाटेलच याची खात्री नाही. खुद्द त्यांच्या हुजूर पक्षातील अनेक नेते जाहीरपणे स्थलांतरितांना व त्यातही भारतीयांना ब्रिटनमधून हाकलून द्या अशी भूमिका घेत आहेत. या नेत्यांना दुखावणे ऋषी यांना परवडणारे नाही. त्यामुळे ऋषी यांना आपण ब्रिटिशांहूनही कट्टर ब्रिटीश असल्याचे वेळोवेळी दाखवावे लागते. भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्यालाही ते फारसे अनुकूल नाहीत. त्यामुळे त्यांच्या काळात भारतीयांना व्हिसा, व्यापार, नोकर्या इत्यादी बाबतीत झुकतं माप मिळण्याची शक्यता कमी आहे. ऋषी हे दिवाळीच्या पणत्या लावणारे हिंदू असून त्यांच्या मुलींची नावे कृष्णा व अनुष्का आहेत याबद्दल लोकांना उकळ्या फुटत आहेत. पण याच लोकांनी अवघ्या वीस वर्षांपूर्वी एका मूळच्या इटालियन पण भारतीय संस्कृतीत मिसळून गेलेल्या आणि पतीच्या निधनानंतरही भारतातच राहिलेल्या महिलेला पंतप्रधान होण्यापासून रोखले होते हे लक्षात ठेवायला हवे. ऋषींच्या राज्याच्या निमित्ताने आपला दुटप्पीपणा तरी या लोकांच्या लक्षात येवो.
ऋषींचे राज्य

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026