| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
2 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस स्थापन दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने 2 ते 7 जानेवारी दरम्यान ‘रायझिंग डे’ हा सप्ताह अनेक शाळांमध्ये पोलिसांच्यावतीने आयोजित केला जातो. या सप्ताहात विद्यार्थ्यांना कायदेविषयक आणि संरक्षणाविषयक माहिती देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न असतो. त्याचाच एक भाग म्हणून श्रीवर्धन पोलीस ठाणे मार्फत ‘रायझिंग डे’चे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस ठाणे प्रांगणात बुधवारी (दि.7) पार पडलेल्या सप्ताह वेळी श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी विद्यार्थ्यांना ‘रायझिंग डे’ विषयी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना वाईट प्रवृत्ती पासून दूर रहा व मुलींना आपले संरक्षण स्वतः करा, असा सल्ला दिला. पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या विविध शस्त्र साठ्याची अभ्यासपूर्ण माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला राज्य पोलीस दलातर्फे रायझिंग डे हा उपक्रम राबविला जातो. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 2 जानेवारी या दिवशी राज्य पोलीस दलास ध्वज प्रदान केला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन लकडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राठोड व संदीप पाटील तसेच दामिनी पथकातील अंमलदार ज्ञानेश्वरी बामणेकर, कांचन जवान उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली.






