। तळा । वार्ताहर ।
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचे प्रमाण वाढले असल्याने या उष्णतेपासून वाचण्यासाठी नागरिकांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिकांची पाऊले थंडपेयांच्या दुकानांकडे वळली आहेत. उन्हातून काम करताना थकलेल्या शरीराला थंडावा देण्यासाठी नागरिकांकडून थंड पेयांना पसंती मिळत आहे. यासाठी तळा बाजारपेठेत ऑरेंज, मोसंबी,पाईनऍपल, लिंबू सरबत, कोकम सरबत, उसाचा रस यांसारखे विविध थंडपेये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या थंड पेयांच्या किमतीत वाढ झाली असून वाढलेल्या महागाईचा फटका थंड पेयांना देखील बसला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
ज्यूसच्या वाढलेल्या किंमतीचे प्रमुख कारण म्हणजे फळांचे दर वाढले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फळांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. ज्यामध्ये 160 रूपये प्रतिकिलो मिळणारे सफरचंद आता 200 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळत आहेत. पूर्वी 60 रुपये किलो मिळणारे अननस आता 100 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळत आहे. यांसह संत्री व मोसंबीच्या दरातही वाढ झाली असून 90 रुपये प्रति किलो मिळणारे संत्री व मोसंबी आता 120 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळत आहेत. फळांच्या या वाढलेल्या दरामुळे बाजारपेठेत ज्युसच्या किंमतीही वाढल्या आहेत.
गेल्यावर्षीचे दर सध्याचा दर
संत्री 30 संत्री 40
मोसंबी 30 मोसंबी 40
सफरचंद 30 सफरचंद 40
अननस 30 अननस 50
ऊस 15 ऊसाचा रस 20
लिंबू सरबत 10 लिंबू सरबत 25
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ज्यूसच्या किंमतीत वाढ झाली आहे. लिंबूचे दर खूप वाढल्यामुळे लिंबू सरबतही महागला आहे. तसेच सफरचंद, मोसंबी, संत्री, अननस या फळांच्या वाढलेल्या किमतींमुळे त्यांच्या ज्युसचे दर देखील वाढले आहेत. साधारणपणे 15 ते 20 रुपयांची वाढ प्रत्येक ज्यूसच्या ग्लास मध्ये झालेली आहे. – दत्ता साळुंखे ज्यूस विक्रेते.
