नागरिकांचा जीव मुठीत धरुन प्रवास; ट्रेलर तातडीने हटवण्याची मागणी
| सुतारवाडी | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गालगत वाळंजवाडी येथील रस्त्याच्या कडेला एक कॉइल घेऊन जाणारा ट्रेलर मागील पाच दिवसांपासून बंदावस्थेत आहे. रस्त्याच्या वळणावरच हा ट्रेलर बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. तर, यामुळे नागरिकांची मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. कोलाडकडून सुतारवाडी मार्गे विळा-भागाड येथील एका कंपनीकडे 100 टन वजानाच्या दोन कॉइल्स घेऊन जाणारा ट्रेलर शनिवारी (दि.7) पासून वाळंजवाडी रस्त्याकडेला बंद अवस्थेत उभा आहे.
मुख्य रस्त्यावरील हे वळण अत्यंत अरुंद असून, तिथेच हे अवजड वाहन उभे राहिल्याने दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे इशारा देणारे फलक लावलेले नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन एकमेकांवर आदळण्याची शक्यता आहे. तसेच, बंदावस्थेतील या ट्रेलरला वाहने धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर हा ट्रेलर हलवून रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली आहे.
वाहतूक कोंडीने चालक त्रस्त
या परिसरात मोठ्या प्रमाणावर क्रशर खाणी असल्याने खडीने भरलेल्या डंपरची सतत वर्दळ असते. या सोबतच अवजड वाहनांची ही मोठी रहदारी असते. त्यातच हा ट्रेलर वळणावरच उभा असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. कोलाड-सुतारवाडी दरम्यान प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सुरक्षा धोक्यात
वावाळंजवाडी ते कुडली दरम्यान अशा प्रकारे कॉइल्स वाहून नेणारे ट्रेलर वारंवार बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे सुरक्षा धोक्यात आली असून नागरिकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. याप्रकरणी संबंधित ट्रेलर मालक आणि चालकावर कठोर कारवाई करावी आणि हा ट्रेलर तातडीने रस्त्यावरून हटवावा, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
भरा फाटा ते विले भागाड एमआयडीसी मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अशा परिस्थिती रस्त्यालगत बंद अवस्थेत असलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अपघात घडू नये म्हणून या पुढे अशा वाहन चालकांना समज दिली जाईल. अन्यथा संबधित वाहन चालकांवर सक्त कारवाई करण्यात येईल.
-नितीन मोहिते,
कोलाड पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक







