। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्याजवळील सुकेळी गावाकडे जाणार्या रस्त्याच्या समोरील मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या दोन पोलादी कॉइलमुळे वाहनांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन कॉइल तातडीने उचलाव्यात, अशी मागणी वाहन चालक व नागरिकांतून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोलवी येथील जे.एस.डब्ल्यू कंपनीतून विले-भागाड येथील पोस्को स्टील कंपनीमध्ये सोमवारी (दि.23) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पोलादी कॉइल घेऊन जाणार्या ट्रेलर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रेलर महामार्गालगत पलटी झाला होता. महामार्गावरील वाहतुकीला अडथळा नको म्हणून वाहतूक पोलिसांनी हा ट्रेलर घटनास्थळावरून तातडीने हलविला होता. मात्र, त्याचवेळी या ट्रेलरवरून पडलेल्या दोन पोलादी कॉइल मात्र अद्यापही महामार्गालगत साईड पट्टीवर तशाच पडून असल्याने महामार्गावरून येणार्या जाणार्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वाहतूक पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करून उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.