बंद अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग-पेण मार्गावरील कार्लेखिंड येथील चढणीवर अवजड वाहने सतत बंद होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी वेगवेगळी सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये आहेत. तसेच तालुक्याच्या काही ठिकाणी लहान मोठे उद्योगधंदे आहेत. त्यामुळे अलिबाग-पेण मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. सरकारी वाहनांसह खासगी वाहनांची ये-जा वाढत आहे. अलिबाग तालुक्यातील उसर येथील कंपनीत गेल्या अनेक महिन्यांपासून नव्या प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पासाठी लागणारे साहित्यांची वाहतूक अवजड वाहनांद्वारे केली जात आहे. सकाळी नोकरी व्यवसायानिमित्त अलिबागला येणाऱ्या लहान मोठ्या वाहनांना या अवजड वाहनांचा अडथळा कायमच ठरत आहे. कित्येक वेळा वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील कार्लेखिंड येथील वळणदार व चढणीवरील रस्त्यावर अवजड वाहने बंद होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील आठ दिवसांपूर्वी एक कंटेनर बंद पडल्याने कित्येक तास वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती. सुदैवाने मोठा अपघात टळला. पुन्हा या अवजड वाहने रस्त्यावर बंद होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्याबाबत जिल्हा वाहतूक शाखेने योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

अलिबागमध्ये सरकारी कार्यालयांबरोबरच शाळा, महाविद्यालये आहेत. त्याठिकाणी वेळेवर पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांची लगबग असते. याच कालावधीत कार्लेखिंडीतून अवजड वाहनांची वाहतूकदेखील होते. ही वाहने रस्त्यातच बंद पडत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे कार्यालय व शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वेळेवर पोहचता येत नाही. त्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीची वेळ निश्चित करावी, अशी मागणी आहे.

माजी आमदार पंडित पाटील

अलिबाग-पेण मार्गावरील अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. अवजड वाहने सतत बंद होण्याच्या घटनेनंतर त्यावर योग्य तो उपाय करण्यासाठी लवकरच वरिष्ठ पातळीवर मार्गदर्शनपर बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

अनिल लाड,
पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड
Exit mobile version