| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल कंपनीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. या प्रकल्पासाठी लागणारे साहित्य अवजड वाहनांतून आणले जात आहेत. मात्र या अवजड वाहनांच्या वाहतूकीमुळे अलिबाग – रोहा अलिबाग पेण मार्गावर वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. अनेक वेळा वाहनांचा अपघात होण्याची भिती ही व्यक्त केली जात आहे. अरुंद रस्त्यांमुळे वाहतूकीवर त्याचा परिणाम होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रोपेन – डिहायड्रोजनेशन आणि एकात्मिक पॉलीप्रॉपिलीन ( पीडीएच – पीपी परियोजना) प्रकल्प उसर गेल कंपनीमध्ये उभारला जाणार आहे. 2025 पर्यंत हा प्रकल्प पुर्ण व्हावा यासाठी गेल्या नऊ महिन्यांपासून नव्या प्रकल्पाचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. या प्रकल्पाचे काम आतापर्यंत सुमारे 40 टक्के पूर्ण झाल्याची माहिती गेल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारे साहित्य अलिबाग रोहा, अलिबाग पेण मार्गावरून आणले जातात. त्यामुळे अवजड वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून वाढली आहे. अलिबाग – रोहा मार्गावरील रस्त्याची अवस्था बिकट असताना टनावरील मालाची वाहतूक अवजड वाहनांतून होत आहे. प्रकल्पासाठी लागणारे मशनरीदेखील रस्त्यातून अवजड वाहनांतून आणली जात आहे. अवजड वाहनामध्ये असलेल्या महाकाय मशनरीमुळे दोन्ही बाजूकडील रस्ता
अडवला जात आहे. त्याचा परिणाम वाहतूकीवर होत असताना रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडांचेदेखील नुकसान होत आहे. त्यात विद्यूत तारादेखील तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी दुपारी एका मशनरीची वाहतूक वाहनांतून होत असताना अन्य वाहनांचा वेग मंदावला होता. वाहतूक कोंडी झाली होती. मंगळवारी अलिबाग-वावे अरुंद रस्त्यावर धावणाऱ्या अन्य वाहनांना त्याचा फटका बसला. या अवजड वाहनांची वाहतूक सकाळी होत असल्याने नोकरी व्यवसायानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहचण्यास विलंब झाला आहे. त्यात या अवजड वाहनांमुळे अपघात होण्याची भिती देखील व्यक्त केली जात आहे.
गेल कंपनीच्या प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या मालाची वाहतूक अवजड वाहनांतून होत आहे.सकाळी होणाऱ्या वाहतूकीमुळे वाहतूक कोंडीचा फटका अलिबाग – पेण व अलिबाग – रोहा मार्गावर होत आहे. अवजड वाहनांची वाहतूक रात्रीच्यावेळी करण्याची मागणी करण्या येत असून जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.
पंडित पाटील, माजी आमदार
रुग्णवाहिकेला अडथळा
गेल कंपनीच्या प्रवेशद्वासमोर अलिबाग – रोहा मुख्य रस्त्यावरच अवजड वाहनांची पार्कींग केली जात आहे. या वाहनांच्या पार्कींगमुळे अलिबागकडून रोहा कडे जाणाऱ्या रुग्ण वाहिकेला अडथळा निर्माण झाला आहे. बेशिस्तपणे रस्त्यावर होणाऱ्या पार्कींगमुळे अपघात होण्याची भिती असताना रेवदंडा पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.