तातडीने उपाययोजनांची शिवसेनेची मागणी
| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच काही ठिकाणी रस्त्यांवर साचलेल्या शेवाळामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे म्हसळा शहर प्रमुख अभय सुधाकर कुलमकर यांनी म्हसळा नगरपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, म्हसळा नगरपंचायत यांना दिलेल्या निवेदनात शहरातील अनेक भागांत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यावर शेवाळ साचल्याने नागरिक घसरून अपघात होण्याचा धोका वाढला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरावेत तसेच शेवाळ काढून आवश्यक ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकून रस्ते सुरक्षित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नगरपंचायतीविरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता लक्षात घेऊन नगरपंचायतीने तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त होत आहे.याप्रसंगी दक्षिण रायगड जिल्हा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष शौकत हजवाने, शहरप्रमुख अभय कळमकर, उपशहर प्रमुख दीपल शिर्के, नवमान वजगरे, शहर समन्वयक फहद पठाण, शहर संघटक अंकुश नटे, उपविभाग प्रमुख किसन म्हात्रे, समीर लांजेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
